शिवजयंतीचा उत्‍साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंतीचा उत्‍साह
शिवजयंतीचा उत्‍साह

शिवजयंतीचा उत्‍साह

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ ः छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मुंबईसह उपनगरांमध्‍ये मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्यात आला. या वेळी विविध सामाजिक संस्‍था व राजकीय पक्षांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्‍ये नागरिकांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग घेतला. विशेष करून तरुणवर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

कांदिवलीमध्‍ये पालखी मिरवणूक
कांदिवली (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक २० चे माजी नगरसेवक दीपक तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला. सकाळी महाराजांच्या पुतळ्याचे आमदार आशीष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले. तुतारीच्या निनादात महाआरती करण्यात आली. या वेळी मल्लखांब, लेझीम यांचे प्रात्‍यक्षिक झाले तसेच ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. सायंकाळी बंदर पाखाडी गावातील हनुमान मंदिर येथून लाकडी पालखीतून महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवाचे आयोजन महामंत्री योगेश पडवळ, संतोष जाधव, वाॅर्ड अध्यक्ष आर. एस. वर्मा यांनी केले होते.

रेल्‍वेत महिलांनी साजरी केली शिवजयंती
मुंबई ः कल्याणवरून सकाळी ६.३२ वाजता सुटणाऱ्या एसी लोकलमध्ये ‘दे धक्का महिला प्रवासी संघ’च्या वतीने चाकरमानी महिलांनी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्तचा हा नोकरदार महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शिवगर्जना, पाळणा, प्रवासी संघाच्या कार्यपद्धतीचा आढावा, सामाजिक जबाबदरीची जाणीव, अल्पोपाहार अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन या वेळी करण्यात आले होते.

चेंबूर झाले भगवेमय
चेंबूर (बातमीदार) ः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चेंबूरमध्‍ये उत्साहात साजरी करण्यात आली. चेंबूर येथील पांजरापोळ सर्कलजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विविध संघटना, राजकीय पुढारी व नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कुर्ला, नेहरूनगर, चुनाभट्टी, विक्रोळी, प्रतीक्षानगर, टिळकनगर, पालिका एम विभाग, एल विभागात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजाना मानवंदना करण्यात आली. या परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले होते. मिरवणुकीत गुलाल उधळल्याने हा परिसर भगवामय झालेला दिसत होता.

मुलुंडमध्‍ये भाजपकडून मानवंदना
मुलुंड (बातमीदार) ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने वॉर्ड क्रमांक १०४ मधील मुलुंड रेल्वे स्टेशन जवळ, मुलुंड (पश्चीम) येथे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंतीद्वारे सामाजिक संदेश
भांडुप (बातमीदार) ः ‘शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात’ हा गेल्या काही वर्षांपासून रुजलेला नारा आत्मसात करीत भांडुप पश्चिम भट्टीपाडा परिसरात कपडा व्यापारी अजय रांजणे यांनी आपल्या दुकानात सामाजिक संदेश देत शिवजयंती साजरी केली. या वेळी त्यांनी आकर्षक अशी आरास करीत सामाजिक संदेश देणारे फलक लावले होते. आर्थिक संकटामुळे खचून जाणाऱ्या व्यापारी वर्गाला संदेश देत रांजणे यांनी आपल्या दुकानात अनोखा उपक्रम राबविला. छत्रपती शिवरायांना आधी २३ किल्ले द्यावे लागले; परंतु नंतर त्यांनी ३५० किल्‍ल्यांचे साम्राज्य उभे केले. त्यामुळे खचून न जाता हिमतीने संकटावर मात केली पाहिजे, असे या वेळी रांजणे यांनी सांगितले.