
वाड्यात शिवमय वातावरण
वाडा, ता. १९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुक्यात रविवारी (ता. १९) मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तरुण-तरुणींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपली शिवसंस्कृती जोपासताना दिसत होते. तसेच सर्वत्र १९ फेब्रुवारी-जगात भारी, जय जिजाऊ-जय शिवराय असा जयघोष करीत शिवरायांच्या नामाचा जयजयकार होतांना दिसत होता. शुभेच्छापर फलक, गावातील नाक्या-नाक्यावर, चौकात लागलेले दिसत होते; तर दुचाकी, चारचाकी वाहनांवर शिवरायांचे भगवे झेंडे लावलेले दिसत असल्याने सर्वत्र शिवमय वातावरण तयार झाले होते. वाडा शहरात युवराज ठाकरे यांच्या राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने, वाडा शहरात (शरद नगर) भाजप कार्यालयात तालुका शाखेच्या वतीने, रवींद्र घरत व डाॅ. राहुल पाटील यांच्या कृष्णांग सेवाभावी क्रांती-नाणेच्या वतीने; तर युनिक फाऊंडेशन वाडा व शिव प्रतिष्ठान-कोने यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.