
खंदेरी बेटावरील वेताळ मंदिर
अलिबाग, ता. १९ : गडकिल्ल्याची निर्मिती करताना लाखो कारागिरांचे श्रम खर्ची पडले, त्यामुळे हे गडकिल्ले आजही आपल्याला इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. गडकिल्ले बांधल्यानंतर त्या ठिकाणी तितक्याच कलाकुसरतेने देवी-देवतांच्या मंदिरे उभारून पूजाअर्चा केली जात असे. गडकिल्ल्यांवरील अशी अनेक मंदिरे आजही पाहायला मिळतात, यास खंदेरी येथील वेताळ मंदिर अपवाद आहे. येथे वेताळाची कोणतीही घडीव मूर्ती नाही. एका भल्यामोठ्या शिळेची पूजाअर्चा केली जाते आणि तितक्याच भक्तिभावाने हजारो भाविक आजही दर्शन घेतात.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या मजबूत सागरी साम्राजाची साक्ष देणाऱ्या खंदेरी किल्ल्यातील वेताळाचे मंदिर विशेषतः कोळीबांधवांचे श्रद्धास्थान आहे. खंदेरी बेटावरील धक्क्याच्या बाजूलाच उजवीकडे वेताळाचे लाकडी मंदिर आहे. आत एक मोठी शेंदूर लावलेली शिळा आहे. ही शिळा म्हणजेच वेताळ. ही शिळा दरवर्षी आकाराने मोठी होत जात असल्याचे बोलले जाते.
वरळी-मुंबई, सातपाटी, उरण, करंजा, जीवनाबंदर ते थेट सिंधुदुर्गातील कोळीवाड्यातील लोक येथे येऊन वेताळाला मान देतात. प्रत्येक गावकऱ्यांचा मान देण्याचा महिना आणि वार वेगवेगळा असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. हे गावकरी होडीने मंदिरात येतात आणि देवाची पूजाअर्चा करतात. मकरसंक्रांतीनंतर येथे येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढलेली असते. होळीच्या दहा दिवसात परिसराला यात्रेचे स्वरूप येते.
खोल समुद्रात बांधलेल्या किल्ल्यावर हे वेताळ मंदिर असल्याने फारसे परिचित नाही, मात्र, कोळी, आगरी बांधवांचे अनेक शतकांपासून श्रद्धास्थान राहिले आहे. अलिबागच्या कोणत्याही किनाऱ्यावर उभे राहिल्यास जी दोन बेटे दिसतात, त्यातील जवळचे उंदेरी आणि थोडे लांब असणारे खंदेरी बेट. १९९८ मध्ये यातील खंदेरी किल्ल्याचे नामकरण सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सन्मानार्थ ‘कान्होजी आंग्रे बेट’ करण्यात आले आहे. इतिहासातील सत्तासंघर्षातही यातील खंदेरी किल्ल्याचे बहुतांश अवशेष चांगल्या स्थितीत आहेत. मजबूत तटबंदी, तटबंदीवरील तोफा, अद्यापही वापरात असलेले दीपगृह आणि वेताळ मंदिर परिसर. या वेताळाची स्थापना कशी आणि कोणी केली, याची माहिती उपलब्ध नाही.
बेटावर पोहचण्यासाठी सर्वात जवळचे अंतर थळ बंदर असून बंदरातून ५.९ किलोमीटर अंतरावर असलेल्या खंदेरी बेटावर होडीतून जावे लागते. एकदा बेटावर गेले की सहज बाहेर पडता येत नसल्याने अनेकजण एक दिवसाची यात्रा करूनच बाहेर येतात. त्यामुळे वर्षातून एकदा तरी वेताळाच्या मानपानाला जावे, अशी इच्छा येथील प्रत्येकाची असते.