
शिवकालीन शस्त्र व दुर्मिळ नाणी प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : शिवकालीन तलवारी, ढाल, खंजीर, चिलखत, कट्यार यांसारखी शस्त्रे आणि चलनात वापरण्यात येणारी नाणी डोंबिवलीकरांना प्रत्यक्ष पाहता आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डोंबिवलीत मावळा स्वराज्याचा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने ऐतिहासिक शस्त्र व नाणी यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात शिवकालीन विविध शस्त्रे इतिहासप्रेमींना जवळून पहाता आली. शाळकरी मुलांनी सुट्टीचा दिवस असूनही हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. शिवकाळातील तलवारी, कट्यार, चिलखत, वाघनखे, धोप तलवार, पट्टा, ढाल, धनुष्य बाण, भाले, लहान मुलांची शस्त्रे,फरशी, कुऱ्हाड आदि शस्त्रे मांडण्यात आली आहेत. तसेच मराठा संस्थानिकांची नाणी, संपूर्ण हिंदूस्थानातील मराठ्यांची नाणी देखील मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थिती लावली होती. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांना माहिती विचारुन इतिहास जाणून घेत होते.