वऱ्हाडी कादंबरीकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वऱ्हाडी कादंबरीकार
वऱ्हाडी कादंबरीकार

वऱ्हाडी कादंबरीकार

sakal_logo
By

बाबाराव मुसळे

वऱ्हाडी कादंबरीकार

वैदर्भीय साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि कथाकार म्हणून बाबाराव मुसळे यांची ओळख आहे. वाशीम जिल्ह्यातील मैराळडोह येथे मुसळे यांचा जन्म झाला. येथून नजीकच असलेले ब्रम्हा हे त्यांचे मूळगाव. विज्ञान विषयात पदवीधर झाल्यावर ते वाशीमच्या पारेश्वर महाविद्यालयात सहशिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्यातील साहित्यिक व लेखक विकसित होण्यासाठी ही नोकरी त्यांना फायदेशीर ठरली. विविध कथालेखन स्पर्धांमध्ये त्यांच्या कथांना पुरस्कार मिळत गेल्याने त्यांना कथालेखक म्हणून प्रोत्साहन मिळाले. सत्तरच्या दशकात त्यांच्या अनेक कथा राज्यभरातील विविध साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या. एक दमदार, सशक्त कथालेखक म्हणून साहित्यविश्वात त्यांची ओळख निर्माण झाली.
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांच्या मार्गदर्शनात मुसळे यांनी ग्रामीण साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या ‘हाल्या हाल्या दुधू दे’, ‘पखाल’, ‘वारुळ’, ‘पाटीलकी’, ‘दंश’, ‘स्मशानभोग’, ‘आर्त’, ‘झळाळ’, ‘द लास्टटेस्ट’ या कादंबऱ्या; ‘मोहरलेला चंद्र’, ‘झिंगू लुखू लुखू’, ‘नगरभोजन’ हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याशिवाय ‘शांती अरू’ या टोपण नावाने त्यांचा ‘इथे पेटली माणूस गोत्र’ हा कवितासंग्रहही साहित्यविश्वात चर्चेचा विषय ठरला. त्यांचे बहुतांश लेखन शेतकरी, शोषित, पीडित, दलित, उपेक्षित, आदिवासींच्या प्रश्नांवर आधारित आहे. विशेष म्हणजे त्यांच्या लेखनाची भाषा वऱ्हाडी असल्याने या बोलीतील भावनिकता आणि मिश्कीलता त्यांच्या लेखनात दिसते.