
फोन चोरणारे डिलीव्हरी बॉय अटकेत
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : फ्लिपकार्टच्या माध्यमातून ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेल्या मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयसह त्याच्या सहकाऱ्याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश शिरसाट (२८) व राजू सेठ (२६) अशी या दोघांची नावे असून या दोघांनी तब्बल ५ लाख ९ हजार रुपये किमतीचे २८ महागडे मोबाईल फोन चोरले होते.
मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये राहणारा नीलेश सिरसाट हा नेरूळ एमआयडीसीतील एटेक्स ट्रान्स्पोर्ट स्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि.या कंपनीत इन हाऊस असोसिएट म्हणून काम करत होता. ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑनलाईन मागवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ग्राहकांना घरपोच पोहोचवण्याचे काम ही कंपनी करते. नीलेश शिरसाट हा त्याच्या कंपनीत ग्राहकांच्या वितरणासाठी आलेल्या मोबाईल फोनची चोरी करत होता. त्यानंतर तो त्याच्या मित्र राजू छेदीलाल सेठ याच्या माध्यमातून मोबाईल फोन बाहेर परस्पर विकून आलेल्या रक्कमेचा अपहार करत होता. अशाच पद्धतीने गेल्या काही महिन्यामध्ये कंपनीत वितरणासाठी आलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे २८ महागडे मोबाईल फोन चोरण्यात आले होते. त्यापैकी ३ लाख ४१ हजार रुपये किमतीचे १६ मोबाईल फोन हस्तगत केल्याची माहिती परिमंडळ -१ चे पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.