तुज पंख दिले देवाने...कर विहार सामर्थ्याने
किरण घरत : सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता. २१ : आई घरकाम व वडील ट्रक चालक...तुटपुंज्या पगारावर चालणारे घर... लहानपणापासून पाहिलेली गरिबी या परिस्थितीत वडिलांचे स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्यासाठी दिव्यांग असलेली गुलशन युसुफ पठाण ही कळव्यातील मुलगी अहोरात्र मेहनत घेत आहेत. दोन्ही पायांवरील अपंगत्वावर मात करून कळव्यातील मनीषा विद्यालय केंद्रावर मंगळवारी सकाळीच ती बारावीची बोर्डाची परीक्षा देण्यासाठी दाखल झाली. तिची जिद्द पाहून मुलांसमोर अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी नवा आदर्श निर्माण झाला आहे.
गुलशन युसुफ पठाण ही सध्या कळव्यातील न्यू कळवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावी कला शाखेत शिकत आहे. गुलशन स्वभावाने अतिशय प्रेमळ असून वर्गात तिच्या अनेक मैत्रिणी आहेत. छोट्या स्पर्धांमध्येही ती आवडीने सहभाग घेत असते. गुलशन जन्मापासूनच दोन्ही पायाने अपंग असून तिला आधाराशिवाय उभेही राहता येत नाही. आंघोळीसाठी तिच्या आई-वडिलांना तिला उचलून न्यावे लागते. तिचे अपंगत्व दूर होण्यासाठी तिच्या वडिलांनी राजस्थानमधील उदयपूर येथे तिच्यावर उपचार केले. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
------------------------
सकारात्मक चित्र
मुस्लिम समाजात एकीकडे शिक्षण अर्धवट सोडले जाते व मुलींची लग्ने लावली जातात तर दुसरीकडे समाजात एक आदर्श ठेवणारी व शिक्षणात भरारी मारणारी घटना पाहून गुलशनने दिलासादायक व सकारात्मक चित्र निर्माण केले आहे. दोन्ही पाय अधू असतानाही तिला खूप शिकायचे असल्याने तिच्या जिद्दीला व प्रयत्नाला तिच्या आई-वडीलांनी प्रोत्साहन दिले आहे.
----------------------
गुलशनने पारसिक नगरमधील अजंठा या खासगी शाळेतून दहावीची परीक्षा देऊन ७४ टक्के गुण मिळवले होते. तिला संगणक क्षेत्रात पदवी घेऊन मोठ्या कार्यालयात काम करायचे आहे. त्या हेतूने तिने खूप जिद्दीने अभ्यास सुरू केला आहे. सध्या ती कळव्यातील मनीषा विद्यालय केंद्रावर बारावीची परीक्षा देत आहे. तिचे वडील युसुफ पठाण व तिची आई तिला दुचाकीवरून परीक्षा केंद्रावर आणून बसवतात. गुलशन अगदी परीक्षेच्या शेवटपर्यंत मन लावून मोठ्या जिद्दीने पेपर सोडवते. तिची ही जिद्द पाहून या केंद्रावरील केंद्रप्रमुख प्रा. धनंजय पष्टे हे तिला मदत करत असून, तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. या संदर्भात काळजी घेत आहेत.
------------------------------
मला संगणक क्षेत्रात पदवी घ्यायची आहे. माझ्या आई-वडिलांची गरिबी दूर करून त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे.
-गुलशन पठाण, इयत्ता बारावी
-------------------------------------
माझी मुलगी जन्मताच अपंग असली तरी तिची पुढे शिक्षण घेण्याची उमेद बघून आम्हाला तिला खूप शिक्षण द्यायचे आहे. त्यासाठी मी कितीही कष्ट करायला तयार आहे.
-युसुफ पठाण, पालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.