
तुर्भे परिसरात अमोनिया वायू गळती
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) ः नवी मुंबईतल्या तुर्भे औद्योगिक क्षेत्रातील इंदिरानगर येथील ज्योती डाई केम प्रा.लि. कंपनीच्या कारखान्यात मंगळवारी (ता. २१) अमोनिया वायूची गळती झाल्याची घटना घडली. या वायुगळतीमुळे परिसरातील काही जणांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यातील दोघा जणांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
ज्योती डाई केम प्रा. लि. कंपनीच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या अमोनियाच्या साठ्यातील एक ड्रम फुटल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यावर पाणी टाकले. पाण्याच्या प्रवाहाने अमोनिया वायू नजीकच्या अमोल डेअरी येथील नाल्यात सोडण्यात आला. नाल्याशेजारी लोकवस्ती असल्याने अमोनिया वायूच्या उग्र वासाने नागरिकांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. घसा खवखवणे, धाप लागणे असा त्रास काही नागरिकांना होऊ लागला. तीन नागरिकांना जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, असे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश कोटिवले यांनी सांगितले.