
वारली चित्रकलेला लोकाश्रयाची गरज
कासा, ता. ४ (बातमीदार) : वारली आदिवासी चित्रकलेचा जगभरात ज्यांनी प्रचार व प्रसार केला त्या जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलादालन व्हावे, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला महाराष्ट्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे तो प्रस्तावही मांडला होता; पण याबाबतीत शासनाची उदासीनता दिसून येत आहे.
आदिवासी जमातीची वारली ही वैशिष्ट्यपूर्ण कला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे काम एका लहानशा गंजाड गावात राहणाऱ्या आदिवासी कलाकाराने केले.
ही कला म्हणजे लग्नसोहळ्यात भिंतीवर वारली कलेतील चौक, तांबड्या रंगाच्या गेरूने रंगवलेल्या, सारवलेल्या भिंती, कागदावर निरनिराळ्या आकारातील विविध प्राणी, पक्षी, माणसे, देखावे, सण, समारंभ यांची कलात्मकतेनी मनमोहक आखणी केलेली असते. जिव्या म्हसे यांनी कोणतेही शिक्षण न घेता भारतीय आदिम कलेचा जगभरात प्रसार करणे हा मुख्य हेतू साध्य केला. त्यांच्या या कलेचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिव्या म्हसे यांनी जपान, चीन, अमेरिका, रशिया, इंग्लंड, जर्मनी, बेल्जियम आदी देशांत वारलीचा प्रचार केला. जपानच्या प्रसिद्ध मिथिला म्युझियममध्ये जागतिक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे लावली जातात. येथे म्हसे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्यांना जीवनगौरव, समाजरत्न, तुलसी, कलाश्री, पद्मश्री असे १६ पुरस्कार मिळाले आहेत.
-------------------
प्रसिद्धी मिळत नसल्याची खंत
जिव्हा म्हसे यांनी ६५ वर्षे वारली कलेची सेवा केली. त्यांची मुले सदाशिव व बाळू म्हसे तसेच त्यांचे शिष्य राजेश वांगड व शांताराम गोरखना हा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीने ही कला सातासमुद्रापार पोहचवली. म्हसे कुटुंबीयांची तिसरी पिढीदेखील या कलेत उतरली आहे. कासा, गंजाड परिसरात ५० ते ६० उत्कृष्ट वारली चित्रकार ही कलेत पारंगत झाले आहेत; तरीही या कलेला प्रसिद्धी व लोकाश्रय मिळत नसल्याची खंत वारली कलाकारांनी व्यक्त केली आहे. आदिवासी जमातीची ही वैशिष्ट्यपूर्ण कला, संस्कृती याचे सर्व जगभर पोहचवणायाचे काम ज्या म्हसे यांनी केले त्यांच्या नावे वारली कलादालन त्यांच्या मूळ गावी व्हावे, ही इथल्या सर्व कलाकारांची इच्छा आहे.
---------------
गंजाड भागात एक वारली कलादालन व्हावे, ही माझ्या वडिलांची इच्छा होती. या भागातील वारली चित्रकारांना व त्यांच्या चित्रांना योग्य प्रसिद्धी मिळावी, याकरिता एक कलादालन व्हावे. तसे शासनाने आश्वासन दिले होते. त्यासाठी निधी मंजूर होणार होता; परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतात दिसत नाही.
- बाळू म्हसे, वारली चित्रकार म्हसे यांचे पुत्र