पोटापाण्यासाठी भटकंती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोटापाण्यासाठी भटकंती सुरू
पोटापाण्यासाठी भटकंती सुरू

पोटापाण्यासाठी भटकंती सुरू

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) : पावसाळा संपल्यानंतर पोटासाठी अनेकांची भटकंती सुरू होते. यात गुजरातेतून अनेक नागरिक आपल्या मुलाबाळांसह स्थलांतर करीत पोटासाठी वणवण फिरत आहेत. सध्या कासा-चारोटी परिसरात आपल्या वाहनात सामनासह अनेक नागरिक मुलाबाळांसह खेड्यात विविध गृहोपयोगी वस्तू फिरून विकत आहेत.
खरीप हंगामातील शेतीची कामे पूर्ण झाल्यानंतर गुजरात राज्यातील नागरिक आपला उदनिर्वाह करण्यासाठी खेळणी प्लास्टिकची भांडी, विविध गृह उपयोगी वस्तू डहाणू तालुक्यातील विविध गावांत जाऊन विकत आहे. कासा-चारोटी परिसरात एखाद्या ठिकाणी एक महिना मुक्काम करून गुजरातमधील नागरिक व्यवसाय करीत आहेत. पावसाने माघार घेतल्याने व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्यांचा प्रवास सुरू झाला आहे. गुजरातमधील खेड्यातील हे नागरिक पावसाळा संपल्यानंतर ठिकाणी विविध गावांत मुक्काम करत आपला व्यवसाय करतात. आपल्याबरोबर संसारसाठी लागणारे सर्व साहित्य बरोबर ठेवून एखाद्या जागी तंबू तयार करून आपले घर तयार करतात. सध्या कासा-चारोटी येथे असे अनेक जणांनी तळ ठोकला आहे.
-----
जीवघेणा प्रवास
१ डहाणू तालुका म्हणजे अगदी काही किलोमिटर अंतरपार करून गुजरात राज्य लागते. त्यामुळे पावसाळा संपला की लगेचच अनेक गावोगावी फिरून विविध वस्तुंची विक्री करणाऱ्यांची संख्या या भागात अधिक आहे.
२ मुंबई अहमदाबाद महामार्गावरून काही भागात मुक्काम ठोकून आपला पोटापाण्याचा धंदा करीत असतात. या मध्ये सद्या कासा चारोटी परिसरात मालवाहू टेंम्पोमध्ये कुटुंबासह गावोगावी प्रवास करीत व्यवसाय करत आहेत.
३ आपल्या बरोबर सर्व गृह उपयोगी सामान, भांडी, तंबू, झोपण्यासाठी खाटा अशा सामानासह जीवघेणा प्रवास करीत आहेत. महिला वर्ग, कटलरी वस्तु, प्लास्टिकसामान, चादरी, कपडे, दोर, खुर्च्या, टेबल हे विकून ते आपला उदर निर्वाह करीत आहेत.
-.....
भटकंती करणाऱ्यांना आश्रय
अनेक बंजारा समाजाचे नागरिक पोटापाण्यासाठी भटकंती करीत असतात. तसेच घाटावरील दुष्काळी भागातून मेंढपाळ पालघर, ठाणे जिल्ह्यातील डोंगराळ भागात पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात. येथे चारा विपुल प्रमाणात असतो. त्यामुळे अनेक महिने राहून पाऊस पडण्याच्या पूर्वी आपला संसार पुन्हा माघारी नेत असतात. त्यामुळे डहाणू तालुका पोटापाण्यासाठी भटकंती करणाऱ्यांना आश्रय देणारा तालुका ठरत असल्याचे दिसून येत आहे.
....

आम्ही पंधरा दिवसांपासून आमच्या गावाहून विविध प्लास्टिक सामान घेऊन गाव खेड्यापाड्यात जाऊन विकत आहोत. कोरोनाच्या काळामध्ये खूप हालात दिवस काढावे लागले. पण आता कोरोना नियंत्रणात आल्याने आम्हाला पुन्हा व्यवसाय करणे शक्य होत आहे. असे असले तरी अजून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. पावसाळा सुरू होईपर्यंत आम्ही महाराष्ट्रात राहणार आहोत.
- विपुल साहल, व्यावसायिक