झेंडू शेतीचा शेतकऱ्यांना आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झेंडू शेतीचा शेतकऱ्यांना आधार
झेंडू शेतीचा शेतकऱ्यांना आधार

झेंडू शेतीचा शेतकऱ्यांना आधार

sakal_logo
By

कासा, ता. २२ (बातमीदार) : झेंडू फुलांना सण समारंभात खूप मागणी असल्याने अनेक शेतकरी भात शेती बरोबरच झेंडूच्या लागवडीकडे वळले आहेत. सध्या डहाणू परिसरातील कासा, सायवन, नानिवली, वाणगाव या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना गावातच नवे रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाळ्यातील खरीप हंगाम हाच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पण आता या भागात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने बारमाही शेती या भागात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशात सणासुदीच्या दिवसांसह, विविध धार्मिक कार्यक्रम, मंगलप्रसंगात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या भागातील शेतकरी भात आणि इतर पारंपारिक पिकांसोबत झेंडू फुलांच्या लागवडीकडे वळले आहेत.
झेंडू फुलाचे उत्पादन अडीच ते तीन महिन्यात मिळते. या पिकासाठी उत्तम निचरा होणारी जमीन लागते. त्याचबरोबर कमी पाणी लागत असल्याने आणि वर्षभर उत्पन्न निघत असल्याने तिन्ही ऋतूमध्ये झेंडू उत्पादन घेतले जात आहे. सध्या उन्हाळी हंगामात झेंडूचे उत्पन्न उत्पादन फायद्याचे ठरत आहे. कमी खर्चात लाखांचे उत्पन्न मिळत असल्याने झेंडू लागवडीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी वळत आहेत.
जवळपास पाच ते सहा एकरांमध्ये झेंडूच्या फुलाची लागवड करणारे शेतकरी लाडक्या मातेरा सांगतात की, आम्ही येथील फुले दादर येथील बाजारपेठेत पाठवत आहोत. सध्या आफ्रिकन व फ्रेंच प्रजातीच्या रोपांची लागवड शेतात केली आहे. यात आफ्रिकन झेंडूची रोप १०० ते १५० सेंटीमीटर उंचीचे असून त्याला केशरी आणि पिवळ्या रंगाची फुले येतात. तर फ्रेंच प्रजातीचे रोप ३० ते ४० सेंटीमीटर उंच असून त्याची वाढ झुडपाप्रमाणे होत आहे.
....
कमी खर्च पण उत्पन्न अधिक
झेंडू फुलासाठी पंधरा दिवसांनी एकदा पाणी द्यावे लागते. तसेच महिन्यातून एकदाच खते द्यावी लागतात. या शिवाय विशेष अशी काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे झेंडूसाठी येणारा उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे. पण बाजारात भाव चांगला मिळाला तर मोठा फायदा होतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
...
झेंडूच्या शेतीमुळे जवळपास २० ते २५ जणांना आम्ही रोजगार मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांची भटकंती थांबली आहे. प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर येथील फुले विक्रेतेदेखील येथून फुले घेऊन जातात. तसेच दादर येथील व्यापारी सुद्धा येथून फुले घेऊन जात असून आर्थिक उत्पन्नात वाढ होत आहे.
- लाडक्या मातेरा, झेंडू उत्पादक