‘इव्ही’च्‍या फेम टू अनुदानात सूसूत्रता आणावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इव्ही’च्‍या फेम टू अनुदानात सूसूत्रता आणावी
‘इव्ही’च्‍या फेम टू अनुदानात सूसूत्रता आणावी

‘इव्ही’च्‍या फेम टू अनुदानात सूसूत्रता आणावी

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ ः इलेक्ट्रिक दुचाकीसाठी फेम टू गटातील अनुदान देण्याबाबत केंद्र सरकारने धोरणात सुसूत्रता आणावी; अन्यथा त्याचा फटका छोट्या उत्पादकांना बसेल, असा दावा ओडिसी या इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नेमीन व्होरा यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांना सरकार देत असलेल्या अनुदानात विसंगती असल्याने उत्पादकांवर अन्याय होत आहे. तसेच या अनुदानापोटी उत्पादकांना अकराशे कोटी रुपये अजूनही देणे बाकी आहे. मोठे उत्पादक या स्थितीतही टिकाव धरतील; पण छोट्या उत्पादकांना हा फटका सहन होण्यासारखा नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
अनुदानाच्या अटी-शर्तींनुसार इलेक्ट्रिक दुचाकींसाठी वापरले जाणारे १३ ते २५ भाग भारतीय बनावटीचे हवेत, असे केंद्राचे बंधन आहे. याबाबत सरकारी प्रतिनिधी उत्पादकांच्या कंपन्यांची तपासणी करतात व हे भाग भारतीय आढळले नाहीत, तर अनुदानाचे प्रमाणपत्र रद्द केले जाते. मात्र सरकारने उत्पादकांच्या कंपनीत तपासणी करण्याऐवजी मुळात या भागांचे उत्पादन करणाऱ्यांच्या कारखान्यात जाऊन तपासणी करावी, अशी मागणी व्होरा यांनी केली.

अनुदान २०२४ नंतरही द्यावे
केंद्र सरकारने आम्हाला हे प्रमाणपत्र देण्याऐवजी त्या सुट्ट्या भागांचे उत्पादन करणाऱ्यांनाच भारतीय बनावटीचे सुटे भाग करण्यास व फेम टू प्रमाणपत्र घेण्यास सांगावे. त्याने यासंदर्भातील गोंधळ दूर होईल. सरकारने आम्हाला लक्ष्य करू नये, कारण मुळात हे उत्पादक आम्हाला त्यांचे भाग परदेशी आहेत की नाही, हे सांगत नाहीत. पण केंद्र सरकारला हा तपशील ते देतातच. त्यामुळे सरकारने त्यांच्याकडेच विचारणा केल्यास याबाबत सुसूत्रता येईल व सगळ्यांचा त्रास वाचेल, असे नेमीन व्होरा म्हणाले. हे अनुदान फक्त मार्च २०२४ पर्यंत असून ते त्यानंतरही द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

आगीची शक्यता शून्य
इलेक्ट्रिक दुचाकींना चार्जिंग करताना आगी लागण्याच्या घटना घडत होत्या; मात्र आता या संदर्भातील निकष बदलले असून आगप्रतिबंधक बॅटरी तयार करण्याचे निकष आल्यामुळे आगीची शक्यता शून्य झाली आहे, असेही ते म्हणाले. आधी या उत्पादकांना बँका कर्ज देत नव्हत्या; मात्र आता त्यात सुधारणा होत आहे, असेही नेमीन व्होरा यांनी दाखवून दिले.

इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे. सध्या बाजारात या गटातील शंभर उत्पादक असून भविष्यात फक्त चांगली सेवा देणारेच उत्पादक टिकून राहतील. कारण आता या क्षेत्रातील ग्राहकही चांगलेच जागरूक झाले असल्यामुळे जो भविष्यात ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा, सुटे भाग, विक्रेते व दुरुस्ती सेवा देईल, असेच उत्पादक स्पर्धेत टिकतील.
– नेमीन व्होरा, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, ओडिसी