
डोक्यात जाते घालत मुलाने केली पित्याची हत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : वडिलांना पूर्वी असलेले दारूचे व्यसन, त्यातून होणारी त्यांची चिडचिड आणि घरातील भांडण याला वैतागून एका २१ वर्षे मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात जाते घालत हत्या केल्याची खळबळ जनक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे. जन्मदात्याची हत्या केल्यानंतर मुलाने स्वतःच रामनगर पोलिस ठाण्यामध्ये हजर होत हत्येची कबूली दिली.
श्यामसुंदर शिंदे (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव असून तेजस शिंदे (वय २१) असे हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील खंमबाळपाडा येथील शंकर मंदिराजवळ असलेल्या चाळीत बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. श्यामसुंदर हे मुंबईमहापालिकेमध्ये कामाला होते. निवृत्तीनंतर घरीच असतं. त्यांची पत्नी ही घरकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होती. तर मुलगा तेजस हा डोंबिवली मधील एका महाविद्यालयात शिकत होता. श्यामसुंदर यांना पूर्वी दारूचे व्यसन होते. मात्र त्यामुळे होणारी चिडचिड यामुळे त्यांचे घरी भांडण, मारामारी होत असे. बुधवारी दुपारी तेजस व श्यामसुंदर हे दोघेच घरी होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. वाद झाल्यानंतर वडिल झोपलेले असताना रागाच्या भरात तेजस घरातील जाते वडिलांच्या डोक्यात घातले. व सुरीने गळा कापत त्यांची हत्या केली. टिळकनगर पोलिसांनी तेजस याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली.