काळ्या काचांची चारचाकी रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळ्या काचांची चारचाकी रडारवर
काळ्या काचांची चारचाकी रडारवर

काळ्या काचांची चारचाकी रडारवर

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता.२३ (वार्ताहर)ः चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेअंतर्गत एका दिवसात ७६ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असून वाहनचालकांना नियमांचे उल्लंघन करणे चांगलेच भोवणार आहे.
चारचाकी गाड्यांच्या बाजूच्या काचा पन्नास टक्के व मागच्या बाजूची काच सत्तर टक्के पारदर्शक असावी, असे मोटार वाहन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून अधिक काळ्या फिल्मच्या काचा बसवण्यात येत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे. अशातच चारचाकी गाड्यांच्या काचांना कोणत्याही प्रकारची फिल्म लावू नये, असे आदेश न्यायालयाने दिले असताना पनवेल शहरात अशी वाहने राजरोसपणे रस्त्यांवर फिरत आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा दणका देण्यात आला आहे. याच अंतर्गत मंगळवारी (ता.२१) पोलिसांनी एका दिवसात तब्बल ७६ वाहनावर कारवाई केली असून चार हजारांचा दंड देखील वसूल केला आहे.
------------------------------------------------
विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा
वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म बसवणाऱ्या विक्रेत्यांवरही आरटीओ आता कारवाईचा बडगा उगारणार आहे. तसेच उत्पादकांनीही वाहनांचे उत्पादन करताना पारदर्शक काचा बसवाव्यात, अशा सूचना पनवेल आरटीओ कार्यालयातून देण्यात आल्या आहेत. शिवा. वाहनांची नोंदणी व नूतनीकरण करताना काळ्या फिल्म आढळल्यास त्या त्वरित काढून टाकण्यात येणार असून जोपर्यंत वाहनावर पारदर्शक काचा बसवल्या जात नाही, तोपर्यंत अशा वाहनांची नोंदणीच केली जाणार नसल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.
------------------------------
चारचाकी वाहनाच्या काचा काळ्या करणे, हे वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. वाहन चालकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच उल्लंघन करणाऱ्यांना पनवेल वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
-संजय नाळे, पोलिस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा