सागरी सुरक्षेचे पोलिसांसमोर आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागरी सुरक्षेचे पोलिसांसमोर आव्हान
सागरी सुरक्षेचे पोलिसांसमोर आव्हान

सागरी सुरक्षेचे पोलिसांसमोर आव्हान

sakal_logo
By

सागरी सुरक्षेचे पोलिसांसमोर आव्हान
नऊपैकी फक्त सहा नौकांकडून गस्त सुरू
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २३ ः रायगड जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. सागरी सुरक्षेसाठी नेव्ही, तटरक्षक दल, कस्टम यांच्यासह पोलिस प्रशासन हातात हात घालून काम करीत असतात. सुरक्षेसाठी सहा सागरी पोलिस ठाणे उभारून किनारपट्टीवर घडणाऱ्या घडामोडींवर सागरी गस्ती नौकेद्वारे लक्ष ठेवले जाते; परंतु पोलिस दलातील नऊपैकी जुन्या नौका दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने आता फक्त सहा गस्ती नौकांद्वारे गस्त सुरू आहे. त्यामुळे विस्तृत किनारपट्टीचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान रायगड पोलिसांसमोर आहे.
रायगड जिल्ह्याची किनारपट्टी मालवाहतूक, मच्छीमारांमुळे वर्दळीची झाली आहे. जेएनपीटी, जेएसडब्ल्यू, पीएनपी, दिघी अशी व्यापारी बंदरे आहेत. या बंदरांत होणाऱ्या संशयास्पद हालचालींवरही रायगड पोलिसांना लक्ष ठेवावे लागत आहे. याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. कुंडलिका, सावित्री, अंबा नद्यांच्या पात्रातही ही नैसर्गिक बंदरे आहेत. मालाची चढ-उतार सहज करणे शक्‍य असलेली ही बंदरे नागरी वस्तीपासून दूर असल्याने त्यांचा वापर देशविघातक कारवायांसाठी होऊ शकतो. त्यानुसार रायगड पोलिसांना गस्त वाढविणे भाग पडत आहे; मात्र वाढत्या सागरी रहदारीच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे असणाऱ्या सुविधा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. रायगड पोलिसांच्या ताफ्यात एकूण नऊ नौका होत्या. यातील तीन फायबरच्या गस्ती नौका आता भंगारात गेल्यात जमा आहेत. समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावर पोलिसांची सागरी गस्त कडेकोट बंदोबस्त ठेवणे आवश्यक असल्याने नव्याने तीन नौका भाड्याने घेण्याचे प्रयत्न रायगड पोलिसांचे आहेत.
----------------------------------
दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाला ३० वर्षे होत आहेत. यातून बोध घेत किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या. यामध्ये नौकेद्वारे सागरी गस्त घालण्यास महत्त्व देण्यात आले होते. २००५ मध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रायगड पोलिसांना दोन अद्ययावत नौका दिल्या होत्या; परंतु त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागल्यानंतर पोलिस दलात गस्त घालण्यासाठी फायबरच्या नौका घेण्यात आल्या. या नौका नादुरुस्त असल्याने डागडुजी करूनही त्या वापरात आणणे शक्य नाही.
-----------------------------
खासगी नौका
साईची पालखी- रेवदंडा पोलिस ठाणे
सद् गुरु कृपा- मांडवा
पद्मावती- आगरदंडा
दयाधन- जीवना बंदर श्रीवर्धन
-------------------------------
सुरू असलेल्या सरकारी नौका
सावित्री
कुंडलिका
खांदेरी
रायगड - ४
रायगड - ३
उंदेरी - १
-----------------------
बंद असलेल्या नौका
गोदावरी
कुलाबा
रायगड-२
इतर फायबर बोटी-३
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः----------------------------
अशी आहे सुरक्षा व्यवस्था
- संवेदनशील मासेमारी बंदरांवर टोकन पद्धत
- बाहेरच्या संशयास्पद नौकांना बंदरात प्रवेश बंदी
- सागरी सुरक्षा रक्षकांकडून २४ तास पहारा
- प्रवासी जेट्टींवर शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांची गस्त
- तटरक्षक दलाची हेलिकॉप्टरद्वारे टेहळणी
- मच्छीमारांना संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना.
़़़़ः--------------------------------
गस्ती नौकांची मुख्य जबाबदारी गस्त घालणे, ठराविक ठिकाणी उभे राहून ठेहळणी करणे, नियमित तपासणी करणे, अशी कामे या नौकांवर सोपवण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीवर सरकारी गस्ती नौका कमी पडत असल्याने खासगी नौका घेण्यात येतात. या नौकांवर सागरी पोलिस नेमून गस्त घातली जाते.
- अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड