
दहा वर्षांपासून फरार आरोपीला मुंब्य्रातून अटक
कळवा, ता. २३ (बातमीदार) : बनावट नाव धारण करून विविध राज्यांत वास्तव्य करत लखनऊ पोलिसांना गुंगारा देऊन मुंब्र्यात गेल्या १० वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ आणि उत्तर प्रदेशच्या टास्क फोर्सच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली.
आझमगडच्या सराय पोलिस ठाण्यात मोहंमद दानिश शेख (वय ४२) याच्याविरोधात एका खुनाच्या गुन्ह्याचा १९९९ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आझमगड सत्र न्यायालयाने त्याला २००६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. ही शिक्षा उच्च, तसेच सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवली होती; मात्र जामिनावर सुटल्यावर तो पसार झाला होता. अनेक ठिकाणी शोध घेतल्यावर तो न सापडल्यावर उत्तर प्रदेश सरकारने त्याला पकडण्यासाठी ५० हजारांचे बक्षीस घोषित केले होते. तो गेल्या दहा वर्षांपासून मुंब्रा परिसरात राहत असल्याची लखनऊ स्पेशल टास्क फोर्सला माहिती मिळाली होती. तो मुंब्र्यात ओळख बदलून मोहंमद मुस्तकीन अब्दुल खलीक हे बनावट नाव धारण करून राहत होता. या परिसरात पोलिस पथकाने जवळपास ३६ तास तपास मोहीम राबवून त्याच्या मुसक्या आवळल्या.