
डिजिटल सुविधांचा लाभ घेणा-या प्रवाशांना बेस्टमध्ये प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मोठ्या रांगेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत डिजिटल पर्यायांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बस प्रवेशासाठी प्राधान्य मिळणार आहे. या नव्या पर्यायामुळे बस प्रवाशांमध्ये खटके उडण्याची चिन्हे आहेत. बेस्टच्या डबलडेकर बसच्या निमित्ताने या मॉडेलला सुरुवात होण्याचे संकेत बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.
डिजिटल पद्धतीचा प्रसार आणि वापर मोठ्या प्रमाणावर होण्याकरीता उपक्रमाच्यावतीने उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरीता मार्च महिन्यापासून काही अतिरिक्त सुविधा देण्यात येणार आहेत. याअंतर्गत ‘बेस्ट चलो ॲप’ अथवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’चा अवलंब करणाऱ्या प्रवाशांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे आकारणीमुळे प्रवाशांना सुट्ट्या पैशांची अडचण निर्माण होणार नाही. विशेषतः सुरुवातीच्या बस थांब्यांवर अशा प्रवाशांना सर्वप्रथम प्रवेशाची सुविधा राहील. या डिजिटल पर्यायांना प्रवाशी स्वतः ऑनलाईन माध्यमाबरोबर बसगाडीतील बस वाहकाकडून देखील रिचार्ज करू शकतील. प्रवाशांनी उपलब्ध ‘बेस्ट चलो ॲप’ किंवा ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे बेस्ट उपक्रमातर्फे आवाहन करण्यात आले आहे.