
आरोग्यवर्धिनी केंद्रांना सुरुवात
विरार, ता. २४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका परिसरात १२ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येत आहेत. १५ व्या वित्त आयोगानुसार हा प्रकल्प पालिकेने हाती घेतला असून यापैकी चार केंद्र नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आली आहेत. तसेच उर्वरित केंद्र सुरू होणार असल्याचे महापालिकेने सांगितले. त्यामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांना पालिकेच्या आरोग्य सेवेचा अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत सध्या २१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि पालिकेची रुग्णालये आहेत. वाढती लोकसंख्या पाहता ही आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. यासाठी पालिकेने बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले असताना दुसऱ्या बाजूला प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्यादेखील वाढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असतानाच त्यातच १५ व्या वित्त आयोगानुसार पालिका हद्दीत १२ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गरजेच्या विविध ठिकाणी ही केंद्रे उभारण्याचे पालिकेने ठरवले आहे. यातील चार आरोग्यवर्धिनी केंद्रांचा शुभारंभ पालिकेतर्फे करण्यात आला. यासह तीन केंद्रे तयार झाली असून ती उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. अन्य पाच केंद्रांसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले.
रुग्णांना मोफत उपचार
आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये एक आरोग्य अधिकारी, परिचारिका, एएनएम, सफाई कर्मचारी आणि बहुउद्देशीय कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या सर्वांचे वेतन हे सरकारतर्फे देण्यात येणार आहे. तसेच आरोग्यवर्धिनी केंद्राची इमारत ही पालिकेची असणार आहे. पालिकेची आरोग्य सेवा ही मोफत उपलब्ध असल्याचे पालिकेने सांगितले.
वसई-विरार महापालिका हद्दीत १२ आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी चार केंद्र सुरू झाली असून तीन केंद्रांचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी या केंद्रांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.
- डॉ. विजयकुमार द्वासे, उपायुक्त, वसई-विरार महापालिका
सुरू झालेली केंद्रे
वैतरणा येथील फणसपाडा, विरार येथील फुलपाडा, नालासोपारा येथील उमरोळी आणि वसई पश्चिमेच्या माणिकपूर.
उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील केंद्रे
चंदनसार येथील कोपरी, विरार येथील डोंगरपाडा आणि नायगाव पूर्व येथील परेरा नगर.
आरोग्यवर्धिनी केंद्रातील सुविधा
- गरोदर माता आरोग्य तपासणी
- टेली कन्सल्टेशन
- लसीकरण
- आरोग्याबाबत जनजागृती
- रुग्णांची प्राथमिक तपासणी (ओपीडी)
- मोफत औषधे, तपासणी आणि रक्त चाचणी