
सुमेरियन, इजिप्शियन संस्कृतीचे कुतूहल
खारघर, बातमीदार
प्राचीन इजिप्तची संस्कृती नेहमी लोकांना गूढ वाटत आली आहे. ''द ममी''सारखा चित्रपट किंवा तत्सम माहितीपट किंवा पिरॅमिड्समुळे सर्वसामान्यांच्या मनात प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीबाबत कुतूहल नेहमीच राहिले आहे. इजिप्तप्रमाणे तितकीच प्राचीन असलेली सुमेरियन संस्कृती जी आजच्या इराक-सीरिया परिसरात साधारण ४५०० वर्षांपूर्वी विकसित झाली होती. जिच्यासोबत आपल्या सिंधू-संस्कृती म्हणजेच हडप्पन संस्कृतीचा व्यापारी संबंध राहिला आहे. या दोन्ही अतिप्राचीन भाषा इतिहासाचा अभ्यासक असलेला खारघर वसाहतीमधील शैलेश क्षीरसागर तरुण शिकत आहे.
शैलेश यांनी प्राचीन इराणमधील ३५०० वर्षे जुनी पर्शियन क्युनिफॉर्म भाषेचे शिक्षण झाल्यानंतर अवेस्ता, सुमेरियन भाषा आणि प्राचीन इजिप्शियन भाषा शिकत आहे. शिक्षण घेत असताना क्षीरसागर हे पाकिस्तानमधील काही तरुण-तरुणीस पर्शियन भाषेचा ऑनलाईन शिक्षण देत आहे. क्षीरसागर यांनी इतिहास विषयात पदवी यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख डॉ. मुग्धा कर्णिक आणि पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व विषयात प्रमाणपत्र आणि ॲडव्हान्स प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. तसेच सर जेजे इंडो इराणियन इन्स्टिट्यूटमधून अवेस्ता भाषेत शिक्षण आणि अर्मेनियातील प्रो. निशान यांच्याकडे प्राचीन ओल्ड पर्शियनचे शिक्षण घेतले आहे. सुमेरियन भाषा गॅब्रियल आणि फ्लोरिअन या इटालियन शिक्षकाकडून तर प्राचीन इजिप्शियन भाषा अमेरिकेतील ऑरिलियो नावाच्या मार्गदर्शकाकडून शिकत आहे. वरील शिक्षण घेताना इंडिया स्टडी सेंटर, मुंबई येथे प्राचीन ओल्ड पर्शियन क्यूनिफॉर्म; तसेच अमेरिकेतील शिकागो महाराष्ट्र मंडळात प्राचीन इराणच्या सांस्कृतिक विकासाबाबत आणि पाकिस्तानातील गांधार रिसोर्स सेंटर येथे प्राचीन गांधारच्या इतिहासासाठी प्राचीन क्यूनिफॉर्म लिपीचाऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभाग यांच्यासाठी प्राचीन क्यूनिफॉर्म लिपीबाबत कार्यशाळेत सहभाग घेता आले.
सुमेरियन संस्कृती आणि भाषा
इराक, सीरिया या देशातील नद्यांचा खोऱ्याच्या मेसोपोटेमिया प्रदेशात सुमेरियन ही संस्कृती विकसित झाली. हे लोक क्यूनिफॉर्म लिपी सुमेरियन भाषेसाठी वापरत असे. यांचा काळ साधारण इसपू २५०० पर्यंत मागे जातो. हरप्पन /सिंधू-संस्कृतीच्या काही मुद्रा येथे मिळाल्याने या संस्कृतीचा तेथे थेट व्यापार व्हायचा, असे दिसून येते. हरप्पन संस्कृतीस किंवा प्राचीन भारताच्या त्या भागास सुमेरियन लोक मेलूहा म्हणत, असे सुमेरियन लिपीत लिहिलेल्या लेखांत दिसून येते. इजिप्तच्या निरनिराळ्या राजांशी केलेल्या पत्रव्यवहाराचे मृत्तिका लेखी प्रत सुमेरियन साहित्यात आढळून येते. जागतिक प्रलयासंबंधी वर्णन असलेली ४ हजार वर्षे जुनी कथा म्हणजेच प्रसिद्ध गिलगामीशची कथा याच भाषा आणि लिपीत आहे. म्हणून प्राचीन मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठी हा अभ्यास करणे गरजेचे आहे. सुमेरियनच्या अभ्यासातून आपल्याला काही प्रमाणात हरप्पन संस्कृतीबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इजिप्शियन भाषा
प्राचीन इजिप्तमध्ये ४ हजार वर्षांपूर्वीपासून चित्रलिपी वापरली जात होती. इजिप्तमधील एका प्राचीन शिलालेखात इराणमधील राजा दारियसच्या राज्यात असलेल्या सिंध प्रांताचा उल्लेख हिंदुश असा आहे. हा तेथील भारताचा थेट उल्लेख आहे. या भाषांच्या अभ्यासामुळे पिरॅमिड्सबाबत; तसेच या संस्कृतीबाबत आणि प्राचीन इजिप्तमधील ३ हजार वर्षांहूनही जुन्या साहित्यातील मनोरंजक कथा वाचून त्यांचे आपल्या भाषांत भाषांतर करणे सहज शक्य होईल.
करिअर संधी
सुमेरियन, इजिप्शियन या भाषांच्या तज्ज्ञांची युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इजिप्त आणि अशा देशांतील शैक्षणिक संस्था आणि वस्तुसंग्रहालयांत ठेवलेली प्राचीन भूर्जपत्रे आणि शिलालेख, मृत्तिकालेख वाचण्यासाठी गरज भासत असते. हजारो लेख हे तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने जगभरातील वस्तुसंग्रहालयांत न वाचताच पडून आहेत. या क्षेत्रात आपल्यास चांगल्या करिअरची संधी मिळू शकते.
सध्या समाज माध्यमांद्वारे प्राचीन संस्कृतींबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. उदा. प्राचीन संस्कृती परग्रहवासीयांनी निर्माण केल्या किंवा इराकमधील प्राचीन सुमेरियन वीरांना भारतातील देवता म्हणून सांगणे अशी चुकीची माहिती पसरवून दिशाभूल केली जात आहे. यामुळे अनेकांकडे जागतिक पातळीवर चुकीचा संदेश जातो. हे सर्व थांबवण्यासाठी या लिपी आणि भाषा अगदी मूळ शिलालेखांतून शिकणे आणि त्याचा खरा अर्थ लोकांना सोप्या भाषांत समजावून सांगणे हा प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोणत्याही दक्षिण आशियाई देशांत या प्राचीन भाषा कुठेही शिकवल्या जात नाहीत. ही पोकळी भरून काढणे आवश्यक आहे. या भाषा भारतात शिकण्याची संधी मिळाल्यास परदेशी शिकण्यासाठी हजारो डॉलर्सचा खर्च टाळता येईल.
- शैलेश क्षीरसागर, पर्शियन क्यूनिफॉर्म भाषेचा अभ्यासक