
फुलझाडांचा दारी बहर
अजित शेडगे, माणगाव
विविध हंगामात पर्यावरण, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी अनेक प्रकारच्या फूल-फळ झाडांची लागवड करत असतात. यावर्षी योग्य वातावरण असल्याने अनेक पर्यावरणप्रेमींनी कुंडीतील फूल-फळ लागवडीला पसंती दिली आहे. काही दिवसांपासून रोपवाटिका व फळझाडे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कुंडीतील लागवडीला चांगली पसंती मिळत आहे.
घरामध्ये आणि बागेमध्ये शोभेसाठी फुलझाडांची लागवड पावसाळी दिवसात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर हिवाळ्यात योग्य वातावरणामुळे रोपांची वाढ चांगली होते. यामुळे या दिवसात कुंडीतील रोप लागवडीला प्राधान्य दिले जाते. सध्या गावोगावी, बाजारपेठेत फूल, फळझाडे विक्रेते रोप घेऊन विक्री करत आहेत. कमीत कमी ४० रुपयांपासून चांगल्या प्रतीचे रोप विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जास्वंद, गुलाब, मोगरा, तगर इत्यादी फुलझाडांबरोबर पपई, लिंब आदी फुलझाडांनाही कुंडीतील लागवडीसाठी चांगली मागणी आहे. अलीकडे कुंडीमध्ये व कमीत कमी जागेमध्ये होणाऱ्या रोपांना मोठी मागणी असून ग्रामीण व शहरी भागात लागवड केली जात आहे. घराच्या गच्चीवर, बागेमध्ये कुंडीमध्ये लागवड करून घरांची शोभा वाढवण्यासाठी फुलझाड लागवड केली जाते आहे.
वाढ झालेल्या रोपांना मागणी
महिला हळदी-कुंकू समारंभात वाण म्हणून या दिवसांत रोपांना मागणी असते. हे लक्षात घेऊन अनेक रोपवाटिकांमध्ये फूल, फळझाडांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. खास पुणे व परिसरातील रोपवाटिकातून रोपे आणली जात आहेत. साधारणतः सहा महिने, दोन ते तीन वर्षांपर्यंतचे रोप घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
डिसेंबर, जानेवारीमध्ये अनेक जण फुलझाडांची लागवड करत असतात. त्यासाठी खास पुण्यातून फुलझाडांचे विविध प्रकार आणले आहेत. गुलाब, जास्वंद इत्यादी रोपांना चांगली मागणी आहे. कमीतकमी ४० रुपयांपासून रोपविक्रीसाठी उपलब्ध आहे.
- मनोज साहा, रोपविक्रेता
हिवाळ्याच्या सुरुवातीला रोपलागवडसाठी योग्य वातावरण असल्याने त्यांची वाढ चांगली होते. घर शोभेसाठी व सुशोभीकरणासाठी फुलझाडे लावत असतो. पर्यावरण संतुलन व आल्हाददायक वातावरणासाठी कुंडीतील लागवड चांगला पर्याय आहे.
- शैला खडतर, फुलझाड प्रेमी