
पालघर जिल्ह्याची वनसंपत्ती बहरणार
प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्यात वन क्षेत्राचा मोठ्याप्रमाणात विस्तार आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने जंगलाचे व पशुपक्ष्यांचे संवर्धन व्हावे म्हणून वन विभागामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एकूण २४८.३८ चौरस किलोमीटर राखीव क्षेत्राची घोषणा वनविभागाने केली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वनसंपत्ती बहरणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे. त्याचबरोबर माकड, ससे, वानर, कोल्हा, रानडुक्कर, रानमांजर, साळिंदर, सांबर, हरिण यासह विविध प्राणी, पक्षी, स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडत असते. याशिवाय येथे विविध प्रकारचे वृक्ष आहेत. मात्र अनेकदा संवर्धन न झाल्याने या वन्य प्राण्याचा अधिवास धोक्यात येतो. मानवी घुसखोरीने पशुपक्षी, प्राणी भयभीत होत आहेत. तसेच अचानक जंगलात आग लागल्यास निसर्गाला हानी पोहचत असते. त्यामुळे वन विभागाने अधिकाधिक वनसंरक्षणासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यानुसार जंगलातील पाणवठे, वृक्षसंपदा, वन्यप्राण्यांचे संरक्षण याकडे लक्ष वळविले आहे. यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृती, मार्गदर्शन केले जात आहे. तसेच राज्यात घोषित केलेल्या १८ नवीन संवर्धन क्षेत्रामध्ये पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्राचा विकास होणार आहे..
एकीकडे पालघर जिल्ह्यातून अनेक केंद्र व राज्य सरकारच्या प्रकल्पांना गती येऊ लागली असल्याने मोठ्याप्रमाणात जमिनी बाधित होत असताना वनक्षेत्राचा विकास व संवर्धनाची विचार केला गेल्याने पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांना हक्काचा अधिवास, मानवाची होणारी घुसखोरीवर नियंत्रण येणार आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत मिळणार असून प्रदूषणाला रोखण्यास हातभार लागणार आहे.
--------------
पर्यटनाला चालना
पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी राखीव वनक्षेत्र असणार आहे. त्यामुळे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या पर्यटकांची येथे रेलचेल वाढणार आहे. त्यातून पर्यटनाला चालना व जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. तसेच वृक्ष, पशू, पक्ष्यांना देखील हक्काच्या अधिवासात सुरक्षित राहता येणार आहे.
------------------
राखीव वनक्षेत्र - चौरस किलोमीटर
जव्हार -११८. २८
डहाणू - ४९. १५
धामणी - - ८०.९५
------------------
वन पट्ट्याच्या विकासाला चालना
पालघर, वसई, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तालुक्यात वनपट्टे वनहक्क पट्ट्यांचे क्षेत्र २८ हजार ९०० हेक्टर इतके आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील वनपट्टे विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. येथे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळाव्यात. शेती लागवडीला सिंचन व पाण्याची सुविधा मिळावी व त्यातून व्यवसाय वृद्धिंगत कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे वन पट्ट्याच्या विकासाला चालना मिळू शकते.