
विक्रमगडमध्ये महिलेची ६० हजार रूपयांची फसवणूक
विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : वसुरी येथे राहाणाऱ्या काशी काशिनाथ गावित (वय ५५) या मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बॅंक ऑफ महाराष्ट्र विक्रमगड येथे पैसे काढण्याकरीता आल्या असताना दोन भामट्यांनी त्यांना विश्वासात घेत पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांपैकी ६० हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. काशी गावित या भोपाली आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. त्या मंगळवारी दोन लाख रुपये काढण्याकरीता बॅंकेत आल्या होत्या. याचवेळी तेथे टेहळणी करणाऱ्या दोन भामट्यांनी त्यांना पैसे मोजून देतो, असे सांगत त्यांनी काढलेल्या दोन लाख रुपयांपैकी हातचलाखीने ६० हजार रुपये घेऊन पोबारा केला. रात्री गावित यांनी पैसे मोजले असताना त्यामध्ये ६० हजार कमी आढळले. दुसऱ्या दिवशी बुधवारी त्यांनी बॅंकेत यांची विचारणा केली असता सीसी टीव्ही फुटेजमुळे सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, हे दोन्ही भामटे सीसी टीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
कोट
प्रतिक्रिया-
गावामध्ये दुकानदारांनी आपल्या दुकानात व रस्त्यांचे चित्रीकरण करता येईल असे सीसी टीव्ही बसवण्याची गरज आहे. तसेच कुणाही अज्ञात इसमांवर भरोसा करू नये व कोणाच्याही हातामध्ये आपली रक्कम देऊ नये. तसेच काही संशयित आढळल्यास पोलिसांना कळवावे.
- प्रदीप गीते, पोलिस अधिकारी, विक्रमगड पोलिस ठाणे