
श्रीकृष्णनगर पूल पादचाऱ्यांसाठी खुला होणार
मुंबई, ता. २५ ः बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर नदीवरील पूल रविवारपासून पादचाऱ्यांसाठी खुला होईल, तसेच पुढील पंधरा दिवसांत सर्व कामे पूर्ण करून पूल रहदारीसाठी खुला करण्याचे आश्वासन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज (ता. २५) दिले.
विभाग क्रमांक एकचे विभागप्रमुख व मागाठाण्याचे शिवसेना आमदार (शिंदे गट) प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण नगर नदी पुलाच्या बांधकाम पाहणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचा आज पाहाणी दौरा झाला. नागरिकांच्या सोयीसाठी पूल लवकर खुला करण्याची मागणी शिक्षक सेनेचे शिवाजी शेंडगे यांनी केली. या वेळी एका बाजूचा पादचारी पूल रविवारपर्यंत लोकांसाठी खुला करा, तसेच पंधरा दिवसांत पुलाची एक बाजू रहदारीसाठी खुली करावी, असे निर्देश लोढा यांनी दिले. त्यास महापालिका अधिकाऱ्यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे सुर्वे यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.