पशु पक्ष्यांनाही सोसवेनात उष्णतेच्या झळा

पशु पक्ष्यांनाही सोसवेनात उष्णतेच्या झळा

Published on

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २७ : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळांचा नागरिकांना त्रास जाणवू लागला असून मुक्या पशू-पक्ष्यांनाही या झळा सोसवेना झाल्या आहेत. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मूर्च्छित होतात आणि कोसळतात. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्यामुळे गच्चीवर, आवारात, रस्त्यावर पडलेले दिसतात. कल्याण-डोंबिवलीत प्राणी मित्रांना उष्‍म्‍याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असून, पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करा, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून करण्‍यात येत आहेत.

होळीनंतर तापमानात बदल होऊन उन्हाळा सुरू होतो; परंतु यंदा होळीपूर्वीच उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. तापमानातील बदलामुळे नागरिकांना संसर्गजन्य आजार जडत आहेत. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून, दुपारच्या वेळेस शहरातील तापमानाचा पारा हा ४० अंशांच्या घरात गेला आहे. सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना मुक्या पशू-पक्ष्यांनाही याची झळ बसू लागल्याचे दिसून येत आहे.
-----------------------------
घुबडाला उष्‍माघाताचा फटका
कल्याणच्या गांधारी रिंग रोड येथील पुलाजवळ शिंगाडा घुबड संजय जाधव यांना आढळून आले. प्राणीमित्र महेश बनकर यांना त्यांनी तात्काळ याची माहिती दिली असता महेश यांनी जाऊन पाहणी केली. पक्ष्याच्या पायात मांजा अडकला होता. तसेच उष्माघाताचा फटका त्याला बसल्याचे दिसून आले. याआधीही डोंबिवलीत कबूतर, चिमणी, कावळा यांना उष्‍म्‍याचा फटका बसल्याने ते रस्त्यावर मूर्च्छित होऊन पडले असल्याची माहिती प्राणी मित्र सचिन गरुड यांना मिळाली होती.
----------------------
शहरातील अनेक भाग ओसाड
वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे माणसांना नकोसे होत असतानाच अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था ही बिकट होऊ लागली आहे. शहरी भागात ठराविक पट्ट्यातच वनराई टिकून राहिली असून अनेक भाग हे ओसाड झाले आहेत. अशा भागांत अन्नाच्या शोधात पक्षी दूर अंतरावर उडत जातात. याचवेळी उन्‍हाळ्याच्या झळा त्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
------------------------------

उन्हाचा तडाखा आता वाढू लागला आहे. दुपारच्या वेळी ऊन जास्त असल्याने या वेळेत पक्षीही झाडांचा आसरा घेत सावलीत रक्षण करीत आहेत; परंतु बऱ्याचदा काही पक्षी हे अन्नाच्या शोधात दूरवर उडून आल्याने त्यांना याचा फटका बसतो. सकाळ, संध्याकाळ लवकर घरट्याबाहेर पडून पशू-पक्षीही अन्न शोधून दुपारच्या वेळी घरट्यात विश्रांती करत असल्याचे दिसून आले आहेत.
- महेश बनकर, पक्षीमित्र
-------------------------------------------
पक्षी उष्मरक्तीत असून १०४ ते १०५ अंश इतके त्यांच्या शरीराचे तापमान आहे. त्यांच्या शरीराचे तापमान जेव्हा वाढते तेव्हा उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी आपले पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतो. अनेक प्रकारच्या पिसांनी त्यांचे शरीर आच्छादलेले आहे. दुपारच्या वेळेस त्यांच्या शरीरातील तापमान वाढलेले असल्याने अनेकदा पाण्याच्या डबक्यात दुपारच्या वेळेस डुबकी मारताना, पाणी पिताना ते आपल्याला या दिवसांत आढळून येतील.
- सचिन गरुड, पक्षीमित्र
------------------------------
भूतदया गरजेची...
- उन्हाचा वाढता तडाखा पाहता यापुढे याचा फटका पशू-पक्ष्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जवळच्या परिसरात पशू-पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय केली पाहिजे.
- जंगल, माळरान भागात पाणवठे आटत असून पाण्याच्या शोधात पक्षी दूरवर उडत येतात. त्यांच्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करणे आवश्यक आहे.
- एखादा पक्षी मूर्च्छित होऊन पडलेला आढळून आला तर त्याला सावलीत गार हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. कलिंगड, काकडी, टरबूज असे थंड पदार्थ त्यांना या दिवसांत खायला द्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com