सहा एकर जागेत आर्किड फुलाची लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा एकर जागेत आर्किड फुलाची लागवड
सहा एकर जागेत आर्किड फुलाची लागवड

सहा एकर जागेत आर्किड फुलाची लागवड

sakal_logo
By

अच्युत पाटील : सकाळ वृत्तसेवा
बोर्डी, ता. २७ : पालघर जिल्ह्यात भाजीपाला, भात, फुलशेती करून पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत, पण नवनवीन प्रयोग करून भाजीपाला लागवडीतून उत्पादन घेणारे प्रयोगशील बागायतदार रामचंद्र सावे यांचे नाव देशभरात आहे. ते भाजीपाला शेतीकडून थेट फुलशेतीकडे वळले आहेत. सहा एकर जागेत त्यांनी ऑर्किड फुलांची लागवड केली आहे.
वडिलोपार्जित दोन एकर जमिनीतून शेती व्यवसायाला सुरुवात करणारे रामचंद्र सावे यांनी मागच्या अनेक वर्षांपासून शेडनेटमध्ये पिके घेण्यास सुरुवात केली आहे. गेली ४० वर्षे शेती करत असून त्यांनी वेलवर्गीय भाज्यांसह पारंपरिक पिके घेऊन विक्रम केला आहे; परंतु ढोबळी मिरची, टोमॅटो, अचारी मिरची इत्यादी पिके शेडनेटखाली घेऊन विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे. चालू वर्षी त्यांच्याकडे तीस एकर मिरचीचे पीक शेडनेटखाली आहे, पण आता त्यांनी फुलांच्या शेतीकडे लक्ष वळवले आहे. यासाठी त्यांनी सुरुवातीला एक एकर ऑर्किड फुलांची लागवड केली. तीन वर्षांनंतर त्यांनी यात पाच एकरांची भर घालून आता ते सहा एकर ऑर्किडची शेती ग्रीन हाऊसमध्ये करीत आहेत. पालघर जिल्ह्यात प्रथमच सावे यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्किड फुलांची लागवड केली आहे. त्यामुळे त्यांची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी देशभरातून येत असतात. त्यांनाही ते योग्य मार्गदर्शन करीत असतात. आपल्या प्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी व तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी त्यांचा नेहमी खटाटोप असतो.
-----------
ऑर्किड जातीच्या फुलांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. व्यवस्थापन खर्चही फार करावा लागत आहे. ऑर्किड फुलांची मशागत करण्यासाठी तज्ज्ञ मजुरांची गरज लागते. तसेच पाणी व खत व्यवस्थापन हे संगणकीय यंत्रणेवर करावे लागते. फुलशेतीकरिता शुद्ध पाण्याची गरज असल्यामुळे शेतीमध्ये मोठा शेत तलाव केला आहे. भूगर्भातील पाणी शेत तलावात सोडून या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आरो प्लांट उभारला आहे.
- रामचंद्र सावे, प्रयोगशील शेतकरी
-------------
विविध पुरस्कारांनी सन्मान
रामचंद्र सावे यांना शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे शेतीनिष्ठ, कृषिनिष्ठ तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ‘सकाळ’ समूहाच्या ‘ॲग्रोवन’ दैनिकाने स्मार्ट शेतकरी पुरस्कारही त्यांना प्रदान केला आहे.