
वाहनांचा धूर ठरतोय वायू प्रदुषणासाठी कारणीभूत
पीयूसीकडे दुर्लक्ष घातक
वायुप्रदूषणातील वाढीला वाहनांचा धूर कारणीभूत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने वाहनचालकांना वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र त्याची आरटीओ पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी आधीच मुंबई महानगरात वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले असताना पीयूसी नसलेल्या वाहनांचा धूर प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. सुधारित केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी नसलेल्या वाहनावर कठोर कारवाई करून दंडाच्या सूचना आहेत; मात्र कारवाया होत नसल्याने सर्रास विनापीयूसी वाहने शहरात धावताना दिसून येत आहेत.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर वाहनासोबतच एक वर्षाचे वाहन पीयूसी प्रमाणपत्र मिळते; मात्र त्यानंतर प्रत्येक वाहनास शासनमान्य पीयूसी सेंटरवर तपासणी करून प्रमाणपत्र मिळवणे व वाहन चालवताना सोबत बाळगणे आवश्यक आहे. वाहन चालवताना प्रमाणपत्र नसेल, तर संबंधित अधिकारी यांच्याकडून मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहनचालकावर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याशिवाय देशभरासाठी एकच पीयूसी ग्राह्य धरली जाते. असे असूनही वाहनचालकांकडून पीयूसीकडे दुर्लक्ष होत असून ते घातक आहे.
वाढलेल्या वाहनांचा फटका
मोठ्या प्रमाणावर वाढलेले नागरीकरण, त्याबरोबरीने असलेली वाहने आणि वृक्षसंपदेचा झालेला ऱ्हास, यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. शहराच्या लोकसंख्येएवढीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. या वाहनांमधून कार्बन मोनाक्साईड, हायड्रोकार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जातात. त्यास लगाम लावण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी) बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांमधून बाहेर पडत नाही ना, हे पाहणे हा पीयूसी चा उद्देश आहे; मात्र पीयूसी म्हणजे केवळ दंड वाचवण्याचे साधन झाले असून, ते देणाऱ्या यंत्रणांकडूनही गांभीर्याने तपासणी केली जात नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.
कारवाई थंडावली
परिवहन विभाग, आरटीओ विभागाकडून पीयूसी नसलेल्या वाहनावर नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार नियमित कारवाई करणे अनिवार्य आहे; मात्र मुंबईसह राज्यभरात दंडात्मक कारवाई थंडावली आहे. सर्वाधिक विनापीयूसी वाहने ग्रामीण भागात असून, बांधकाम क्षेत्रात आणि शेती क्षेत्रात काम करणाऱ्या वाहनांच्यासुद्धा पीयूसी कालबाह्य झालेल्या दिसून येत आहेत.
पीयूसीची नियमित कारवाई केली जाते. वाहनांची कागदपत्रे तपासणी करताना पीयूसी तपासणीसुद्धा एक भाग आहे. पीयूसी मेमो दिल्यानंतर सहा दिवसांच्या आत पीयूसी नूतनीकरण करणे अनिवार्य असते.
- भरत कळसकर, आरटीओ अधिकारी, ताडदेव
पीयूसीची माहिती
पीयूसी म्हणजे प्रदूषण प्रमाणपत्र. आपल्याला गाडी चालवताना जसा विमा काढावा लागतो त्याचप्रमाणे वाहन चालवण्यासाठी प्रदूषण प्रमाण पत्र तयार करावे लागते. त्यामध्ये वाहन जास्तीचे प्रदूषण करत आहे का याची वेळोवेळी तपासणी केली जाते. प्रदूषण प्रमाणपत्राचा मुख्य उद्देश वाहन तपासणे आणि वातावरण बरोबर ठेवणे हा आहे. वाहनांकडून उत्सर्जित होणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन विभाग यांच्याकडून प्रत्येक वाहनास प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र हे बंधनकारक करण्यात आले आहे.
क्यूआर कोड
पीयूसी फॉर्मवर एक क्यूआर कोड छापण्यात येत असून यामध्ये वाहन, मालक आणि उत्सर्जन प्रमाण याबाबतची माहिती मिळणे सहज सोपे झाले आहे. नवीन पीयूसीमध्ये वाहन मालकाचा मोबाईल नंबर, नाव व पत्ता, इंजिन नंबर आणि चेसिस नंबरही असेल. याद्वारे डेटाबेसमधून एखाद्या वाहनाबाबतची माहिती मिळवण्यास मदत होते; मात्र पीयूसीसाठी वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले असून त्याच क्रमांकावर पडताळणी आणि शुल्काविषयीचा एसएमएस पाठवला जात आहे.