
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा !
डोंबिवली, ता. ७ (बातमीदार) : जिल्ह्यात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होते; त्याचबरोबर उपयुक्त इलेक्ट्रोलाईट्ससुद्धा कमी होतात. त्यामुळे चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणे, चिडचिड होणे, अतिशय घाम येणे असे त्रास होतात. अशा परिस्थितीत आरोग्यासंबंधी आणि आहारासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
आपण फळांचा ज्यूस किंवा सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करतो. उन्हाळ्यात पचनाशी संबंधित आजार उद्भवू शकतात म्हणून हलके अन्न खाणे, जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. ओट्स, बार्ली आणि गव्हाच्या पदार्थांचा समावेश आहारात करणे अत्यंत उपयोगी आहे. काही पदार्थांचा समावेश आहारात केल्याने उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होईल.
---------------------------------------
------------------------------------------
काय घ्यावे?
लिंबू पाणी ः लिंबू पाणी दिवसातून दोन वेळा प्यायल्याने आपल्या शरीराचे आरोग्य उत्तम होईल. लिंबू पाणी हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आहे. जे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समांतर ठेवण्यास मदत करते. लिंबू पाणी शरीरातील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते आणि शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
-----------------
ताक ः उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये ताक बनवले जाते. या दही शेकमुळे आपल्या पोटातील आग आणि पित्त दूर होते.
--------------------
कैरीचे पन्हे ः कैरीचे पन्हे प्यायल्यानेसुद्धा उन्हाळ्यात थकवा जाणवत नाही.
---------------------
पुदिना सरबत ः पुदिन्याचे सरबत हे उन्हाळ्यात आपल्या शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते. थंडगार औषधी वनस्पती म्हणून पुदिन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पुदिन्यासारख्या औषधी वनस्पती पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात.
----------------
नारळपाणी ः नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. त्याचबरोबर आपल्या पोटातील आम्लाची पातळी कमी करण्यास मदत होते.
----------------------------
दही ः शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही सगळ्यात उत्तम मानले जाते. दह्यामुळे अन्न पचनास मदत होते.
---------------------
-----------------------------------------------------------------
काय टाळावे?
आईस टी ः आईस टी प्यायल्याने वजन वाढते. आईस टीमुळे आपण पाणी कमी पितो. दिवसातून कमीत कमी आपण आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. म्हणूनच आईस टी पिणे टाळले पाहिजे.
-------------
बर्गर आणि हॉट डॉग्स : बर्गर, फ्राईज आणि हॉट डॉग्समध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे वजन वाढते. हे सगळे अन्न पचवणे खूप कठीण असते.
------------------------------------------------------
पाण्याने समृद्ध फळे आणि भाज्या : उन्हाळा आला की कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी आणि पीच ही फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होईल. काकडी खाल्ल्यानेदेखील शरीरातील उष्णता कमी होते.
-------------------------
मसाल्याचे पदार्थ : उन्हाळ्यात मसाल्याच्या पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. मसाले हे उष्ण असल्याने उन्हाळ्यात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळले पाहिजे.
---------------------------------
मांसाहार : उन्हाळ्यात पचनशक्ती कमी होत असल्याने पचनास जड असलेले पदार्थ खाणे टाळावे.
----------------------
मद्यपान : अल्कोहोल हे उष्ण गुणाचे असते. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते; त्यामुळे उन्हाळ्यात मद्यपान करणे टाळावे.
---------------------
कोल्ड्रिंक्स : बाजारात विविध प्रकारची कोल्ड्रिंक्स उपलब्ध आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड्रिंक्सचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते; परंतु हे कोल्ड्रिंक्स शरीराला अपायकारक आहेत. त्यामुळे कोल्ड्रिंक्स सेवन कमी प्रमाणात करावे. तसेच उन्हाळ्यात चहा-कॉफी ही पेयेसुद्धा कमी प्रमाणातच प्यावीत.
-----------------------------
कोट
उन्हाळ्यात घशाला कोरड पडून वारंवार तहान लागते. भूकही कमी होऊन पचनशक्ती मंदावते. त्यामुळे पचनास हलका आहार घेतला पाहिजे व जास्तीत जास्त रसदार फळांचे सेवन केले पाहिजे. उन्हाळ्यात जेवणात काकडी, बीट यांचा समावेश करणे गरजेचे आहे.
- अर्जुन काटे, आहारतज्ज्ञ