
धुळीच्या प्रदूषणाने मुलुंडकर हैराण
मुलुंड, ता. २७ (बातमीदार) ः गेल्या काही महिन्यांपासून मुलुंडमधील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या वायुप्रदूषणामुळे मुलुंडमधील मॅरेथॉन अव्हेन्यू मार्ग येथील तब्बल २२ नागरिक आजारी पडले असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी प्रशासनाकडेही तक्रार केली असून प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा मुलुंडकरांचा आरोप आहे.
मुलुंडमधील या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना या प्रदूषणाबद्दल सर्व माहिती दिली. त्यावर कोटेचा यांनी प्रदूषणाला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुलुंड पश्चिमेतील एलबीएस मार्ग येथे सिव्हरेजचे काम गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या भागामधील साधारण एक किलोमीटरचा पट्टा पूर्णपणे खोदला गेला असल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना श्वास घेण्यामध्ये अडचण येत आहे. २२ नागरिक श्वसन विकाराने त्रस्त असून ते सर्व जण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. महापालिका आयुक्त आणि सचिव सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी क्लायमेट प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत प्रकल्पाशी संबंधित जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
- मिहिर कोटेचा, आमदार