
भाईंदरमध्ये ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन
भाईंदर, ता. २७ (बातमीदार): कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर महानगरपालिकेने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महापालिकेचे मुख्यालय ते ग्रंथालय असलेल्या नगरभवनपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यात आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी तसेच महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरभवन येथील सभागृहात यानिमित्त ग्रंथप्रद्रर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. प्रदर्शनात इतिहास, विज्ञान, व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवरील ग्रंथ ठेवण्यात आले होते.
नगरभवन येथे सुमारे तीस वर्षांपूर्वी तत्कालीन मिरा-भाईंदर नगरपरिषदेच्या काळात ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. या ग्रंथालयाचे पंचवीस वर्षांहून अधिक काळ सभासद असलेले लेखक सागर कुलकर्णी, मंगला मराठे, अरुण गोखले, शुभदा रामसिंग, सुचिता जोशी, महापालिकेच्या निवृत्त ग्रंथपाल विश्वभारती चहांदे यांचा विशेष सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. लेखक सागर कुलकर्णी यांनी या वेळी एका वालीची गाथा व मिशन कितेलव्ह ही दोन पुस्तके ग्रंथालयाला भेटस्वरुपात दिली.