पालघर-डहाणूला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर-डहाणूला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था
पालघर-डहाणूला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

पालघर-डहाणूला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

sakal_logo
By

मनोर, ता. १ (बातमीदार) : पालघर आणि डहाणू तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुरवस्था झाली आहे. डहाणू तालुक्यातून बोईसर आणि पालघर भागात जाण्यासाठी मोगरबाव, जांबूपाडा, परनाळी रस्त्याचा वापर केला जातो; परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मोगरबाव-परनाळी रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नसल्याने रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. डहाणू व पालघर पंचायत समितीअंतर्गत असलेल्या बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून रस्त्यावरील खड्डे बुजविले होते; तर काही काही ठिकाणी डांबरीकरण केले होते; पण सहा महिन्यांच्या कालावधीत रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
रस्त्यांची दुरवस्था झाल्याने टायर पंक्चर आणि वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना वाढल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. मोगरबाव परनाळी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परनाळी जांबूपाडा भागातील शेतकरी बोईसर, डहाणू, वाणगावसह मुंबई बाजारपेठेत आपला भाजीपाला विक्रीसाठी नेण्यासाठी परनाळी, मोगरबाव रस्त्याचा वापर करतात; पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळेत भाजीपाला पोहचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
....
पाच महिन्यांपूर्वी दुरुस्ती
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चार ते पाच महिन्यांपूर्वी तालुक्यातील रस्त्यांची लाखो रुपये खर्च करून डागडुजी केली होती; पण या रस्त्यांची योग्य ती देखभाल न केल्याने पुन्हा मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
...
परनारळी ते मोगरबाव नाका या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
- संजय कुलकर्णी, उपविभागीय अभियंता, पंचायत समिती, पालघर
...
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहनचाकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले पाहिजे.
- तुषार राऊळ, ग्रामस्थ