रोहा-कोलाड राज्य महामार्गाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहा-कोलाड राज्य महामार्गाला गती
रोहा-कोलाड राज्य महामार्गाला गती

रोहा-कोलाड राज्य महामार्गाला गती

sakal_logo
By

रोहा, ता. २८ (बातमीदार)ः शहरातून जाणाऱ्या उसरोली (मुरूड) रोहा-कोलाड या राज्य महामार्गाच्या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी सुरुवात झाली होती, परंतु या कामाला नागरिकांनी विरोध केल्याने प्रशासनाकडून रस्त्याच्या जागेची पुन्हा मोजणी करण्याचे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले होते. त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून रस्त्याची मोजणी केली जात असून रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे बेकायदा बांधकामावर कारवाईची टांगती तलवार आहे.
रोहा शहरातून जाणाऱ्या मुरूड- रोहा- कोलाड या राज्य महामार्ग क्र. ५ चे काम सद्यःस्थितीत सुरू आहे. यातील शहरातून जाणारा तीन किलोमीटर भाग हा सिमेंट काँक्रीटचा बनवण्यात येत आहे. आजवर झालेल्या कामाबाबत नागरिकांकडून अनेक तक्रारी करण्यात येत होत्या. शहरातून जाणारा मार्ग भविष्यातील वाढत्या रहदारीवर पर्याय ठरावा, यानुसार त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे; मात्र या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अडथळ्यांबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही दिवसांपूर्वी यासंबंधित सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, व्यापारी वर्ग, तसेच शहरातील नागरिकांच्या झालेल्या बैठकीत आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे खासदार तटकरे यांनी सर्वप्रथम नागरिकांच्या सूचनेप्रमाणे शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेच्या दोन्ही बाजूंच्या सीमा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख खात्याकडून मोजणी करण्याचे आदेश अधिकारी वर्गाला दिले होते. त्या आदेशांची अंमलबजावणी करताना सोमवारी (ता. २७) या मोजणी कामास सुरुवात झाली. या मोजणी प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा सर्वसमावेशक अशी बैठक घेत या रस्त्याच्या कामास सर्वानुमते जो निर्णय होईल त्यानुसार पुढील काम पूर्णत्वास जाणार आहे.
---------------------------------
कोंडीच्या समस्येतून सुटका
मुरूड- रोहा- कोलाड राज्य महामार्ग क्र. ५ ची पूर्णपणे दुरवस्था झाल्याने हा मार्ग धोकादायक ठरत होता. याबाबत विविध स्तरांतून निवेदने, रास्ता-रोको, मोर्चे काढून हा रस्ता नव्याने उभारण्याची मागणी होत होती. अखेर २०२२ मध्ये या मार्गाचे काम सुरू झाले. यातील रोहे शहरातील जाणाऱ्या ३ किलोमीटर भागाचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाढत्या रोह्याचे स्वरूप पाहता होणाऱ्या रस्ता रुंदीकरणामुळे कोंडीच्या समस्येतून सुटका होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.