आरोग्य सेवेसाठी शिवसेना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सेवेसाठी शिवसेना आक्रमक
आरोग्य सेवेसाठी शिवसेना आक्रमक

आरोग्य सेवेसाठी शिवसेना आक्रमक

sakal_logo
By

विरार, ता. २८ (बातमीदार) : वसई-विरारकरांच्या आरोग्य सुविधांकरिता शिवसेना आक्रमक झाली आहे. नालासोपारा-आचोळे येथील सुसज्ज दोनशे खाटांचे रुग्णालय आणि वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयातील प्रस्तावित जोडइमारतीचे काम तत्काळ मार्गी न लागल्यास लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिला आहे.
वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा-आचोळे आरक्षण क्रमांक- ४५५ व सर्व्हे क्रमांक- ६ येथील प्रस्तावित सुसज्ज दोनशे खाटांच्या रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आले होते. या कामासाठी वसई-विरार महापालिकेने १५ कोटी ८२ लाख इतक्या निधीची तरतूद केलेली आहे. या रुग्णालयाच्या कामासाठी कार्यादेशही काढण्यात आलेला होता; तर वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयातील जोडइमारतीचे भूमिपूजन नोव्हेंबर २०२० मध्ये तत्कालीन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले होते. या कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद पालिकेने केलेली आहे. या भूमिपूजनांनंतर या रुग्णालयांचे काम तात्काळ मार्गी लागणे अपेक्षित होते; मात्र आचोळे येथील प्रस्तावित रुग्णालय वसईच्या एव्हरशाईन आचोळे स्मशानभूमीच्या जवळ होणार असल्याने याला नागरिकांचा विरोध असल्याचे कारण वसई-विरार महापालिकेकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे निश्चित जागी हे रुग्णालय न होता थोडे पुढे बांधले जाणार आहे. त्यासाठी सुधारित आराखडा तयार करून लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती वसई-विरार महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली आहे; तर सर डी. एम. पेटिट रुग्णालयातील जोडइमारतीचे काम ठेकेदाराने माघार घेतल्याने रखडल्याची माहितीही पालिकेतून देण्यात आलेली आहे.
....
...तर सर्वस्वी पालिका जबाबदार
शहरात सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत नसल्याने मुंबई-ठाणे येथे जावे लागत आहे. प्रस्तावित रुग्णालयांच्या माध्यमातून वसई-विरारकरांना या सुविधा मिळतील, अशी आशा आहे. त्यामुळे या रुग्णालयांचे काम तातडीने मार्गी लागावे, अशी विनंती पंकज देशमुख यांनी पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना पत्राद्वारे केली आहे. अन्यथा, वसई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आपल्याविरोधात पालिका मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. या वेळी होणाऱ्या किंवा घडणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकारास सर्वस्वी पालिका जबाबदार असेल, असा इशाराही देशमुख यांनी आयुक्तांना दिला आहे.