लाल मिरचीचा बाजारात ठसका

लाल मिरचीचा बाजारात ठसका

तुर्भे, ता. २८ (बातमीदार)ः खवय्यांना चटकदार जेवणात लागणाऱ्या मसाल्यासाठीची लाल मिरची नवी मुंबईतील बाजारात दाखल झाली आहे; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीचे दर किलोमागे २० ते ३० टक्के वाढल्यामुळे वर्षभराचा मसाला बनवणाऱ्या गृहिणींचे आर्थिक नियोजन कोलमडणार आहे.
उन्हाळा आला की गृहिणी वर्षभर पुरेल इतका मसाला बनवण्याच्या कामाला लागतात. हल्ली बाजारात सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या, तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. संपूर्ण हंगामात कर्नाटकमधून बेडगी, काश्मिरी, आंध्र प्रदेशमधून रेशमपट्टी, लवंगी, मध्य प्रदेशातून गुंटूर आणि महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातून पांडी मिरची येते; पण यंदा घाऊक बाजारातील मिरचीचे दर ९० ते ५५० रुपये किलोवर पोहोचले आहेत. गत वर्षी हेच दर ८० ते ३५० रुपयांच्या घरात होते. त्यामुळे मिरचीच्या सर्वच प्रकारांमध्ये दरात किलोमागे २० ते ३० टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
--------------------
प्रांतानुसार जेवणात वापर
महाराष्ट्रीयन नागरिक जास्त प्रमाणात बेडगी, काश्मिरी, संकेश्वरी आणि पांडी या मिरच्यांचा वापर मसाल्यात करतात. पांडी मिरची ही मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी वापरतात, तर संकेश्वरी मिरचीमुळे तिखटपणा व रंगही मसाल्याला येतो. काश्मिरी व बेडगी मिरची ही रंगास गडद, चवदार, दीर्घकाळ रंग टिकणारी व कमी तिखट असते. रेशमपट्टी मिरचीला गुजराती नागरिकांची जास्त मागणी असते. ती कमी तिखट असते.
---------------------------------------
परराज्यातून मोठ्या प्रमाणात आवक
महाराष्ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्रांपैकी ६८ टक्के क्षेत्र हुबळी, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्राबरोबरच विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होते. कर्नाटक, मध्य प्रदेशातून येणारी मिरची मुंबईकरांच्या जास्त आवडीची आहे. अशीच तिखट मिरची कोल्हापूर, सांगली, नाशिक, गुजरातमधील नवसारी येथूनही येते. पुसा ज्वाला, संकेश्वरी, बेडगी, लवंगी या मिरच्यांना बाजारात अधिक मागणी असते.
--------------------------------------------
मिरचीचे प्रकार सध्याचे दर (प्रतिकिलो)
पांडी : ९० ते १४०
बेडगी : ३९० ते ५५०
काश्मिरी : १८० ते २९०
संकेश्वरी : १४० ते ३८०
लवंगी : १०० ते ४५०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com