मोखाड्याचे कृषी अधिकारी पद प्रभारीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोखाड्याचे कृषी अधिकारी पद प्रभारीच
मोखाड्याचे कृषी अधिकारी पद प्रभारीच

मोखाड्याचे कृषी अधिकारी पद प्रभारीच

sakal_logo
By

मोखाडा, ता. १ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्याला गेल्या पाच वर्षांपासून कायम कृषी अधिकारी नाही. प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर तालुक्याचा कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या सरकारी योजनांची अंमलबजावणी होण्यास अडचण निर्माण होत आहे. खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होत नसून कृषी क्षेत्र दहा वर्षे मागे गेल्याचा आरोप करत येथे कायमस्वरूपी तालुका कृषी अधिकारी नियुक्त करण्याची मागणी माजी उपसभापती बशीर अन्सारी यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.
मोखाडा तालुक्यात एकमेव खरिपाचे पीक घेतले जाते. अन्य पिकांसाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. मुळातच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मोखाडा तालुक्यात शेतकऱ्यांना सरकारी योजनांवर अवलंबून रहावे लागत आहे. शेतीच्या सर्व सरकारी योजना तालुका कृषी कार्यालयामार्फतच राबवल्या जातात; मात्र या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात गेल्या पाच वर्षांपासून कायम कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

----------------------
प्रोत्साहनाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान
कृषी कार्यालयाचा कारभार गेल्या पाच वर्षांपासून प्रभारी कनिष्ठ अधिकारी पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजना राबवण्यात कुचराई होत आहे. वेगवेगळ्या योजनांची तातडीने अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांना वेळेवर बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून दिले जात नाही. तसेच शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पन्न घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातून प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना खासगी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे लागत आहे. त्यामुळे मोखाड्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेती क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे.

-------------------
मोखाडा भाग हा दुर्गम असल्यामुळे या ठिकाणी कोणताही अधिकारी यायला तयार होत नाही. अधिकाऱ्यांची येथे काम करण्याची इच्छा झाल्यानंतर ते येथे हजर होतात. वरिष्ठांच्या आदेशानुसार मी येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
- सुनील पारधी, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा