
दहावीच्या मुलांनो यशस्वी भव !
नवीन पनवेल, ता. १ (वार्ताहर)ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिला पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
पनवेल विभागात १८ परीक्षा केंद्र असून ११,९६७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यावेळी प्रथमच भरारी पथकासह बैठे पथकाची नियुक्ती परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. परीक्षार्थींना यंदा दहा मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी मंडळाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. पनवेलमध्ये १०० टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र प्रवेशावेळी शाळेतील कर्मचाऱ्यांमार्फत झडती होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर मुलांच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका / मदतनीसांसह शाळेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हिडीओ रेकॅार्डिंग करण्याच्या केंद्र संचालकांना सूचना देण्यात आल्याची माहिती पनवेल गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी दिली आहे.