२०२५ पर्यंत कर्करुग्णांमध्ये १२.८ टक्क्यांची वाढ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०२५ पर्यंत कर्करुग्णांमध्ये १२.८ टक्क्यांची वाढ?
२०२५ पर्यंत कर्करुग्णांमध्ये १२.८ टक्क्यांची वाढ?

२०२५ पर्यंत कर्करुग्णांमध्ये १२.८ टक्क्यांची वाढ?

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : विविध कारणास्तव मागील काही वर्षांपासून देशातील कर्करुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) अंदाजानुसार २०२५ पर्यंत देशातील कर्करुग्णांमध्ये १२.८ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक नऊ भारतीयांपैकी एकाला कर्करोग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्करुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता वैज्ञकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

बदलती जीवनशैली, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव तसेच वाढत्या प्रदूषणामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने फुप्फुस आणि तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान व उपचार न मिळाल्याने ही समस्या आणखी वाढते. आयसीएमआर-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च बेंगळुरू यांनी नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार, लहान मुलांमधील (० ते १४ वर्षे) कर्करोगांमध्ये लिम्फॉइड ल्युकेमिया (रक्त आणि अस्थिमज्जाचा कर्करोग) हे प्रमुख कर्करोग असतील. २०२५ मध्ये फुप्फुस आणि स्तनाच्या कर्करुग्णांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कौटुंबिक इतिहास, अनुवांशिकता, स्थूलपणा, तंबाखू-मद्यपान, प्रदूषण, चुकीचा आहार, अतिनील किरणे, व्यायामाच्या अभावामुळे कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुहास आग्रे यांनी सांगितले.
---
कर्करोग केवळ वृद्ध किंवा प्रौढांमध्येच नव्हे, तर हल्ली तरुणांमध्येही दिसत आहे. यशस्वी उपचारांसाठी कर्करोग वेळीच ओळखणे आवश्यक आहे. पुरुषांमध्ये डोके, मान, फुप्फुस आणि प्रोस्टेटिक कर्करोगाचे, तर महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वाधिक आढळतो. जागरूकता, तपासणी, लवकर निदान आणि त्वरित उपचार हे गरजेचे आहे.
- डॉ. तनवीर अब्दुल मजीद, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट
......................................
काय काळजी घ्यावी?
तंबाखू सेवन आणि मद्यपान नको
संतुलित आहार
दररोज व्यायाम
अतिनील किरणांपासून संरक्षण
हिपॅटायटीस बी, एचपीव्हीसाठी लसीकरण
असुरक्षित संभोग, पॅसिव्ह स्मोकिंग टाळा
कौटुंबिक इतिहास असल्यास नियमित चाचण्या करा