
आरोग्यदायी कलिंगडे बाजारात
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १ ः मुंबई शहरात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. नागरिक वाढत्या उष्म्याने हैराण झाले आहेत. अशा वेळी शरीराला गारवा मिळण्याकरिता व भरपूर व्हिटॅमिन, प्रोटीन असलेले कलिंगड खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. बाजारातही मोठ्या प्रमाणात कलिंगड दाखल झाले आहेत.
मार्चमध्ये येणाऱ्या होळी सणानंतरच कडक उन्हाळा सुरू होतो. यंदा होळी येण्यापूर्वीच अंगाला चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात शरीराला गारवा व पाण्याच्या पातळीचा समतोल राखण्याकरिता व्हिटॅमिन अ व क तसेच भरपूर प्रोटीन मिळण्याकरिता नागरिक रसाळ व स्वस्त फळे, रस पेयाबरोबर फ्रूट सलाड खाण्यास पसंती देत आहेत.
या कलिंगडला अधिक पसंती
मुंबईत कलिंगडांची आवक वाढली आहे. महाराष्ट्रसह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, अक्कलकोट या ठिकाणांहून येणाऱ्या कलिंगडमधील शुगर क्वीन, नामधारी व शुगर बेबी जातीचे कलिंगड खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत.
दरात वाढ
कलिंगडाच्या दरात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. सहकार भांडार, विविध मॉलमध्ये कलिंगड कमीत कमी १५ ते २० रुपये किलोने मिळत आहेत. खुल्या बाजारात लहान ते मोठे असलेल्या कलिंगडानुसार किंमत ठरवली जात आहे. एक कलिंगड कमीत कमी ७० ते १०० रुपयांपर्यंत विकले जात आहे.
रसालाही पसंती
उपाहारगृहांत कलिंगड ज्यूस एक ग्लासची अंदाजे किंमत १२० रुपये आहे; तर साधारण उपाहारगृह व स्टॉलवर एक ग्लास कलिंगड ज्यूसची किंमत ४० ते ६० रुपये आहे.
कलिंडाला खूप मागणी आहे. विक्रीकरिता आणलेली कलिंगडे दुपारपर्यंत संपतात. हिरवी गार व लालबुंद कलिंगड खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
- जयवंत करंडे, विक्रेते
लालबुंद कलिंगड मुलांना खूप आवडतात. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने खूप फायदा होतो. शरीराला गारवा मिळतो.
- लक्ष्मी पुजारी, ग्राहक