
जनता दलाच्या वतीने वीज दरवाढ प्रस्तावाची होळी
धारावी, ता. २ (बातमीदार) : महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाला दिलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाचा निषेध करत जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने नुकतेच चर्चगेट येथील प्रदेश कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. हा प्रस्ताव महाराष्ट्राला अंधारात लोटणारा असून सामान्य जनतेवर जवळपास ३७ टक्क्यांहून अधिक दरवाढीचा बोजा लादणारा असल्यामुळे तो ताबडतोब रद्द करण्यात यावा, अशी जनता दलाची भूमिका आहे. राज्यभरात ठिकठिकाणी अशा प्रकारे होळी आंदोलन करण्यात आल्याची माहिती प्रदेश महासचिव रवी भिलाणे यांनी दिली. ही दरवाढ रद्द न केल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रभारी प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिला आहे. जनता दलाचे प्रभारी अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, उपाध्यक्ष सुहास बने, राज्य महासचिव रवी भिलाणे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, ज्योती बडेकर आदींच्या नेतत्वावाखाली हे आंदोलन करण्यात आले.