
रेल्वे स्थानकांना कोंडीचे ग्रहण
कामोठे, ता. २ (बातमीदार)ः पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे शहरातील बहुसंख्य नागरिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई उपनगरात रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेस्थानकपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था अपुरी आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे, पण हार्बर मार्गावरील मानसरोवर ते पनवेल रेल्वेस्थानकांबाहेरील अपुऱ्या जागेमुळे वाहने उभी करण्याचा प्रश्न बिकट झाला असून कोंडीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
मानसरोवर, खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात पंतप्रधान आवास योजनेमुळे वाहनतळाची जागा कमी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागत आहे. उशिराने येणारे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत असल्यामुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण दिले जात आहे. वाहतूक कोंडीमुळे पोलिस त्रस्त झाले आहेत. अनेकदा दंडात्मक कारवाई केली जात असून वाहनचालक विरुद्ध पोलिस असा वाद होत आहे. तसेच वाहनतळांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहने बाहेर काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना चालणेही कठीण झाले असून वाहनतळाअभावी स्थानकांना कोंडीचे ग्रहण लागले आहे.
-------------------------------------------------------
मानसरोवर रेल्वेस्थानक परिसरातील वाहनतळाची जागा अपुरी आहे. सिडको, पनवेल महापालिकेने पर्यायी उपाययोजना केली पाहिजे.
- अभय जाधव, कामोठे
-------------------------------------------------
वाहनतळामध्ये जागेपेक्षा अधिक वाहने उभी असतात. वाहने उभी करणे, बाहेर काढण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे किमान स्थानकांबाहेर तरी प्रशस्त वाहनतळाची गरज आहे.
- मधुकर पाटील, पनवेल