जोशी-बेडेकर कॉलेजचे वार्षिक पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोशी-बेडेकर कॉलेजचे वार्षिक पारितोषिक वितरण
जोशी-बेडेकर कॉलेजचे वार्षिक पारितोषिक वितरण

जोशी-बेडेकर कॉलेजचे वार्षिक पारितोषिक वितरण

sakal_logo
By

मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (ता. ४) सकाळी साडेदहा वाजता थोरले बाजीराव सभागृहात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी ज्येष्ठ कवी, पटकथा लेखक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत; तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक भूषविणार आहेत. या वेळी वर्षभरात विविध स्‍पर्धांमध्‍ये, परीक्षांमध्‍ये यश मिळवलेल्‍या विद्यार्थ्यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार होणार आहे.

आर. के. कॉलेजची श्रमदानातून समाजसेवा
मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ, भांडुप संचालित मुंबई विद्यापीठ संलग्न आर. के. बीएड आणि डीएड अध्यापक महाविद्यालयाचे ‘श्रम संस्कार शिबिर’ कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन, नेरे पनवेल येथे झाले. आर. के. बीएड. आणि डीएड. अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असताना शालेय अभ्यासक्रमाबरोबर सामाजिक कार्याची जाणीव विद्यार्थांना व्हावी, समाजकार्याची आवड व्हावी, समाजकार्य म्हणजे काय, याची माहिती व्हावी या करीता संस्थेचे संचालक रमेश खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्रमदान श्रम संस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या श्रमसंस्कार शिबिरामध्ये कुष्ठरोग निवारण समिती येथील परिसर स्वच्छ करून, परिसरात वृक्षारोपण करण्याबाबत काम करणे, तेथील राबवण्यात येणाऱ्‍‌या विविध उपक्रमांची माहिती घेणे, सामाजिक विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हे श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य खिलोनी राऊलकर, प्रा. परदेशी, प्रा. रुपेश तांबे, इतर प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

‘इलेवेट’ बाल महोत्सवात ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग
कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः ‘इलेवेट’ हा दोन दिवसीय बालमहोत्सव नुकताच बोरिवली पश्चिम येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात नऊ शहरे आणि गावांमधील सरकारी शाळांतील नऊ ते १५ वर्षे वयोगटातील ७०० मुले सहभागी झाली होती. फुटबॉलच्या महाअंतिम फेरीत, मुंबई, धारवाड, हैद्राबाद आणि बंगळुरू यांनी फुटबॉलचा सर्वोच्च पुरस्कार पटकावला. हैदराबादला सर्वोत्कृष्ट संघ म्हणून सन्मानित करण्यात आले. संगीत स्पर्धेत हैदराबाद, मुंबई आणि पुणे यांना विजेते घोषित करण्यात आले. पोयसर जिमखान्याचे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक, प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

‘अदृश्यांच्या दृश्य कथा’ पुस्‍तक प्रकाशन
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः दक्षिण अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक एदुआर्दो गालियानो यांच्या निवडक कथा पहिल्यांदाच ‘अदृश्यांच्या दृश्य कथा’ या नावाने मुक्तीयान प्रकाशनातर्फे पुस्तकरूपात प्रकाशित केल्या जात आहेत. शनिवारी (ता. ४) संध्याकाळी साडेपाच वाजता घाटकोपर येथील रमाबाई नगरातील गंधकुटी बुद्ध विहारात हा प्रकाशन सोहळा होत आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने ‘आजच्या काळात लेखकाची भूमिका’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात प्रसिद्ध लेखक आणि नाट्य दिग्दर्शक रामू रामानाथन, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त उर्दू कादंबरीकार रेहमान अब्बास, लेखक श्रीधर पवार हे सहभागी होत असल्याची माहिती योगेश कांबळे यांनी दिली आहे.

केईएमच्या वतीने ‘सत्कर्म’चा गौरव
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः कल्पवृक्ष रुग्णांसाठी या कार्यक्रमा अंतर्गत परेल येथील केईएम रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाच्या वतीने सत्कर्म फाऊंडेशन या संस्थेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी मुंबईसह राज्यातील ५० ते ६० संस्थांना रुग्णालयाने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले. सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक अनुज नरूला आणि दत्तात्रय सावंत यांच्यातर्फे राज्याच्या विविध भागांतील आदिवासी पाडे, गावे आदी ठिकाणी मदतकार्य केले जाते. कोरोना काळात या संस्थेने रुग्णांसाठी औषधोपचार, आर्थिक मदत तसेच सध्या या संस्थेच्या वतीने ३० हून अधिक एकल पालक विद्यार्थांचे दत्तक घेऊन संगोपन कार्य सुरू आहे. संस्थेच्या या कार्याबद्दल केईएम रुग्णालयाने सन्मानचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित केले. रुग्णालयाच्या अधिष्ठाता संगीता रावत, माजी सीडीओ मेधा प्रभू देसाई यांच्या हस्ते हा सन्मान सत्कर्म फाऊंडेशनच्या तारामती भागीत, नयना वाडेकर , लक्ष्मी भागित आदींनी हा सन्मान स्वीकारला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुग्णालयाचे शंभू देव दळवी यांनी केले.