
वास्तववादी लेखिका
संवेदनशील, उपहासात्मक तर कधी चिंतनशील लेखन करून आयुष्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहणारी लेखिका म्हणून प्रिया विजय तेंडुलकर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. नाटक, चित्रपट, मॉडेलिंग, दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम, वृत्तपत्रात लेखन अशा वेगवेगळ्या माध्यमात काम करून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली.
मुंबईत १९ ऑक्टोबर १९५४ मध्ये जन्मलेल्या प्रिया यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स कला महाविद्यालयातून पदविकेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात काम केल्यावर १९६९ मध्ये गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’ नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. कन्यादान, सखाराम बाईंडर, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी, गिधाडे आदी नाटकांबरोबरच हिंदी, मराठी चित्रपटांत निरनिराळ्या भूमिका साकारल्या. बासू चटर्जी यांच्या दूरदर्शनवरील ‘रजनी’ या मालिकेने त्यांना घराघरांत पोहचवले.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या प्रिया यांचे ‘जन्मलेल्या प्रत्येकासाठी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘जावे तिच्या वंशा’ हे कथासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमांतून त्यांनी सामाजिक, राजकीय विषय परखडपणे, आत्मविश्वासाने हाताळले. माणसाने प्रामाणिक असावे, नेहमी सत्य बोलावे आणि सत्याचीच साथ द्यावी, हा संदेश त्यांनी आयुष्यभर जपला. १९ सप्टेंबर २००२ मध्ये वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.