
पतीकडून पत्नीची क्रूर पद्धतीने हत्या
नेरळ, ता. ३ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील हालीवली येथे पतीने कैचीच्या साह्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपीने मुलगी घरात असताना हा प्रकार घडला असून घटनेवेळी सासू त्या ठिकाणी आल्याने त्याने धमकावत पळ काढला होता. मात्र कर्जत पोलिसांनी काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले. या क्रूर घटनेने कर्जत तालुका हादरला आहे.
कर्जत शहराजवळील हालीवली ग्रामपंचायत हद्दीतील सिग्नेचर डिझायर संकुल या इमारतीत संजय रामजे भालेराव हा ४० वर्षीय पत्नी पूजा, तीन मुली आणि एका मुलासह भाडेतत्त्वावर राहत आहे. तो उपनगरी लोकलवर वडापाव विकण्याचा व्यवसाय करतो. या पती-पत्नीमध्ये मंगळवारी घरगुती वाद झाल्याने पत्नीने कर्जत पोलिस ठाण्यात संजयविरोधात तक्रार केली होती. मात्र यानंतर पूजा वांगणी येथील भावाकडे राहण्यासाठी गेली होती. त्यामुळे संजय आणि त्याची मोठी मुलगी घरात होती. आज (ता. ३) पहाटे मुलीने आईला फोन करून तिची आठवण येत असल्याने न्यायला ये, असे सांगितले होते. पूजा मुलीला भेटायला सकाळीच घरी आली होती. दरम्यान, पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला.
रागाच्या भरात पती संजय याने मुलीला हॉलमध्ये ठेवून पत्नीला बेडरूममध्ये कोंडले. यानंतर कपडे कापणाऱ्या कैचीने पत्नीच्या पोटात व पाठीवर वार केले. यानंतर शिलाई मशीनदेखील तिच्या डोक्यात घातली. या प्रहाराने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. घटनास्थळावरून पळ काढत असताना अचानक सासू उपस्थित झाल्याने त्याने सासूलादेखील धमकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. कर्जत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, सहायक पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पळून जाणाऱ्या संजयला पोलिसांनी काही तासांत ताब्यात घेतले.
कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल
व्यसनाच्या आधीन असलेल्या संजयने पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या संशयावरून आणि पोलिस ठाण्यातील तक्रारीवरून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कर्जत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.