निराधार महिलांची ‘सुखशांती’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार महिलांची ‘सुखशांती’
निराधार महिलांची ‘सुखशांती’

निराधार महिलांची ‘सुखशांती’

sakal_logo
By

निराधार महिलांची ‘सुखशांती’

नितीन पाटील ः सकाळ वृत्तसेवा

जागतिक महिला दिनाचा सोहळा साजरा होत असताना समाजात आजही काही स्त्रिया निराधार आयुष्‍य जगत आहेत. त्‍यांच्‍या आयुष्‍यात पुन्‍हा सुखशांती यावी यासाठी काही संस्‍था कार्य करत आहेत. त्‍यापैकी ‘असोसिएशन फॉर सोशल हेल्थ इन इंडिया’(ASHI) ही संस्था आहे. या संस्‍थेने गेली पाच दशके महिलांना सक्षम बनवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.

कुटुंबातील जाचामुळे व अन्य कौटुंबिक हिंसाचारांमुळे घराबाहेर पडलेल्या किंवा पडाव्या लागलेल्या निराधार अशा स्त्रिया, मुलींना जगण्यासाठी भक्कम आधार देत त्यांना रोजीरोटी मिळवून देऊन त्यांना पुन्हा त्यांच्या दुरावलेल्या हक्काच्या घरात पोहचवण्याचे फार मोठे कार्य ही संस्था अविरतपणे करीत आहे. पाच दशकांत सुमारे १४ हजारांहून अधिक निराधार महिलांना माया देत पुन्हा त्यांना सुखरूप आणि सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवण्याचे संस्थेने केलेले कार्य संस्थेची महती सांगण्यास पुरेसे आहे.
साधारणत: १९५६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. सातासमुद्रापलीकडे राहूनदेखील आणि वार्धक्याकडे झुकलेल्या प्रीती शहा यांनी ही संस्था नुसती नावारूपालाच आणलेली नाही, तर रस्त्यावरील निराधारांचे जीवन जगणाऱ्या हजारो महिलांसाठी अत्यंत सुरक्षित आणि विश्वसनीय असे आधारवड म्हणून उभी केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा अंजली गोकर्ण, उपाध्यक्षा वर्षा तावडे, यांच्यासह अधीक्षक, उपअधीक्षक, मेडिकल ऑफिसर, सोशल वर्कर असे अनेक जण समर्पित भावनेने निराधारांचा आधार होऊन कार्यरत आहेत. त्यांच्या सेवावृती हातांना आर्थिक बळ देण्याची गरज आहे.

‘सुखशांती’ केंद्र देते आधार
संस्‍थेने १९७५ मध्ये राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या ‘स्वाधार’ योजनेंतर्गत अणुशक्ती नगर येथे ‘सुखशांती’ हे निराधार महिलांसाठी हक्काचा आधार देणारे केंद्र (आश्रम) सुरू केले. कौटुंबिक हिंसाचारामुळे निराधार झालेल्या तसेच पीडित महिलांना राहण्यासाठी विनामूल्य सुरक्षित निवारा येथे दिला जातो. बऱ्याच वेळा अनेक कारणांनी स्त्रियांना घरातून बाहेर काढले जाते. अशा विविध कारणांनी रस्त्यावर निराधारपणे फिरणाऱ्या महिलांना अजून अन्य कोणत्या संकटांना सामोरे जाऊ नये यासाठी अशांना ‘सुख शांती’मध्ये आणून त्यांना विश्वास देत मानसिक आधार दिला जातो.

परिवाराची पुन्‍हा भेट
विविध कारणांनी निराधार होऊन कुटुंबापासून दुरावलेल्या महिलांना पोलिस प्रशासन तसेच प्रयास, स्नेहा, स्त्री मुक्ती संघटना, भारतीय स्त्री शक्ती अशा सामाजिक संघटनांमार्फत ‘सुखशांती’ मध्ये आणल्या जाते. या संस्थेत दाखल झाल्यानंतर त्यांना मानसिक आधार देत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून तिची नेमकी समस्या काय आहे? तिला घर का सोडावे लागले? हे जाणून घेऊन तिच्या दोन्ही कुटुंबांशी संपर्क साधला जातो. त्यांच्या भेटी घेऊन त्या स्त्रीसह सर्वांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्या घरी तिची सुरक्षित राहण्याची खात्री झाल्यानंतरच तिला तिच्या कुटुंबात पाठवले जाते.

शारीरिक, मानसिक व आर्थिक सुदृढता
‘सुखशांती’त राहणाऱ्या स्त्रियांना राहण्यापासून जेवणापर्यंत सर्वच बाबी विनामूल्य पुरवल्या जातात. याचबरोबर त्यांच्यातील कौशल्य, त्यांच्या आवडी, त्यांची क्षमता आदी बाबी विचारात घेऊन त्यांना वेगवेगळ्या संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या कामांचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर दैनंदिन स्वावलंबनाची कामे, टेलरिंग, बागकाम, साफसफाई आदी कामे दिली जातात. उत्तम आरोग्यासाठी ध्यानधारणा, योगा तसेच होमहवन करून घेतले जाते. समुपदेशनाबरोबरच मोफत वैद्यकीय सुविधाही त्यांना प्राप्त करून दिली जाते. सरकारी नियमानुसार तीन वर्षांपर्यंत या संस्थेत ठेवले जाते तोपर्यंत त्यांना अनेक कामांतून तरबेज करून नोकरी मिळवून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे केले जाते. काही मुलींचे लग्नही करून देत संस्थेने कन्यादानाचे पवित्र कार्यही केले आहे.

आईसोबत मुलांनाही आधार
साधारणतः ३० जणींना एकावेळी सामावून घेण्याची क्षमता असलेल्या ‘सुखशांती’ मध्ये १८ वर्षांवरील मुली/ महिलांना येथे प्रवेश दिला जातो. घरच्या अन्याय-अत्याचारामुळे घरातून बाहेर पडाव्या लागलेल्या काही महिलांबरोबर त्यांची मुलेही असतात. अशा आठ वर्षांपर्यंतच्या मुलांनाही आईबरोबर राहण्यासाठी आधार दिला जातो. पुढे ती मोठी झाल्यावर अन्य संस्थांच्या माध्यमातून त्या मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची सोय केली जाते.

इतर महिलांसाठीही कार्य
अनेक कारणांनी मुंबईत आलेल्या परंतु त्यांची कोठेच राहण्याची सोय नाही अशा महिलांसाठीही संस्थेने पुढाकार घेतला आहे. अणुशक्ती नगर येथील आपल्याच इमारतीत ‘सुखशांती हॉस्टेल’देखील सुरू केले आहे. नोकरी करणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या पण घर नसलेल्या ५० महिला, मुलींना येथे अगदी माफक दरात राहण्याची व खाण्याची सोय केली जाते. कमी उत्पन्न गटातील महिला, मुलींना प्राधान्याने या हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला जातो.

संस्थेची हेल्पलाईन ही आहे. त्याचा नंबर १०९२० आणि २५४८१४८७ असा आहे.

रस्त्यावर फिरणाऱ्या बऱ्याच निराधार महिलांना संरक्षण मिळण्याबरोबरच त्यांचे सक्षमीकरण व्हावयास हवे. त्यासाठी सरकार आणि समाज यांनी हातात हात घालून एकत्रित पुढाकार घ्यावयास हवा; तरच महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबू शकतील. आमची संस्था करीत असलेल्या महिला उत्थानाच्या या कार्यास समाजाकडूनही सर्वार्थाने मदत मिळावी अशी अपेक्षा आहे; तरच आम्हाला निराधारांचा आधार ठरलेला हा यज्ञ सर्वदूर नेता येईल.
- अंजली गोकर्ण, अध्यक्ष, असोसिएशन फॉर सोशल हेल्थ इन इंडिया