
शिमगोत्सवाची लगबग
शिमगोत्सवाची लगबग
अजित शेडगे, माणगाव
माघ महिना संपल्यावर ऋतूंचा राजा वसंताचे आगमन होते. साऱ्या रानाला फळा, फुलांचा बहर येतो. आंबे, काजू, फणस, करवंदे आणि इतर अनेक रानफळे बहरास येतात. अशा वेळेस सर्वांना वेध लागतात ते फाल्गुन पौर्णिमेचे अर्थात होळी पौर्णिमेचे. रायगड आणि संपूर्ण कोकणात होळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. लहानथोर, आबालवृद्ध सारेच या आनंदोत्सवात सहभागी होतात. रानावनात बहर देणारा निसर्ग एका प्रकारे आनंदाने गावागावांत येतो आणि सारे गाव उत्साहात न्हाऊन निघते.
फाल्गुन शु. पंचमीपासूनच शिमगोत्सवाला सुरुवात होते. सातपुड्यातील आदिवासींच्या होळीला जशी दांडापूजनाने सुरुवात होते त्याचप्रमाणे पंचमीपासून लहान होळ्या (ज्याला पिला लावणे म्हणतात) सुरू होतात. गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने होळी लावली जाते. दररोज संध्याकाळी गावातील तरुण, वयोवृद्ध एकत्र येतात. होळीच्या जागेवर गवत पेंढ्याची छोटी होळी करतात. काही हौशी तरुण गवताचे लहान भारे तयार करतात, त्यांना वेलींनी गच्च बांधतात आणि बांबूच्या काठीने हे भारे अडकवून लहान होळीच्या सोबत हे भारे (ज्यांना होके म्हणतात) ते पेटवून तलवार, बनाटीप्रमाणे फिरवतात. काही गावात जंगलातून विशिष्ट प्रकारच्या जाड वेली आणून त्या अग्निमध्ये तापवून दगडावर आपटल्या जातात. त्यांचा विशिष्ट प्रकारे होणारा आवाज उत्साह वाढवणारा असतो. पंचमीपासून नऊ दिवस गावागावांत असा उत्साह संचारतो. ग्रामीण भागातील रात्रीची जेवण आटोपल्यानंतर मोठ्या संख्येने महिला अंगणात एकत्र येतात. शिमगा होळीची गाणी म्हणतात, नृत्य करतात. भाऊ, बहिण, समाज व्यवस्था, व्यसनमुक्ती यावर गीते सादर करून जागर केला जातो.
होळी पौर्णिमेच्या गावकरी एकत्र येत मोठी होळी रचतात. यामध्ये घराघरांतून लाकूड, फाटा, गवत, पेंढ्या उपयोगात नसलेल्या वस्तू, बांबू जमा करून होळी उभारली जाते. रात्रीच्या शुभ मुहूर्तावर घोपी होळीचे फाग म्हणतो. सारे गाव होळीभोवती फेर धरत फाग म्हणतात. ‘या रं पालखीत कोण देव बसं’ हे गाणं आणि तेहतीस कोटी देवांना बोलावून सुवासिनी होळीची पूजा करतात. त्यानंतर होळी पेटवली जाते. पेटत्या जाळांभोवती अनेकजण फेर धरतात. पेटत्या होळीत नारळ टाकण्याची प्रथा आजही सर्वत्र रूढ आहे. याबरोबरीने पेटत्या होळीतून नारळ काढण्याचा खेळ खेळला जातो. अनेक गावातून शिमगोत्सवानिमित्त सार्वजनिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
होळीचे पौराणिक महत्त्व
शिमगोत्सवाला पौराणिक दृष्ट्याही महत्त्व आहे. पुराण कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाला ठार करण्यासाठी कंसाने पुतना या राक्षसीला पाठविले होते. बालश्रीकृष्णाने पुतनाचा कावा ओळखून तिला ठार केले. त्यानंतर गोकुळवासीयांनी मयत पुतनाला गोवऱ्याच्या होळीत जाळले. या दिवसाची आठवण म्हणून सर्वत्र होळी पेटविण्यात येते. तसेच हिरण्यकश्यपूने स्वतः श्रेष्ठ म्हणून घेण्याच्या अट्टाहासाने प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून लोटले, उकळत्या तेलात टाकले, प्रल्हादाची बहीण ढुंढा जिला अग्नित न जळण्याचा वर होता तिला प्रल्हादाला सोबत घेऊन अग्नीत दहन करण्यात आले, मात्र अग्नीत ढुंढा जळून गेली आणि प्रल्हाद वाचला. जे वाईट होते ते जळाले आणि चांगले होते ते राहिले. त्या घटनेची आठवण म्हणूनही होळी पेटविली जात असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी
रायगड आणि कोकणात माघ, फाल्गुन हे महिने तसे निवांत असतात. पावसाळ्यात तयार झालेल्या पिकाची कापणी झालेली असते. लहान मोठी शेतीची कामेही आवरलेली असतात. सकाळ-संध्याकाळ थंडीत शेकोट्या आणि गप्पांचे फड रंगतात. त्यामुळे होलिकोत्सव शेतकऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरतो.
लोककलांचा जागर
मनोरंजनाच्या दृष्टीने शिमगोत्सव अत्यंत महत्वाचा मानला जातो. गावोगावी पारंपरिक लोककला, लोकसंस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक गावच्या वैशिष्ट्यपूर्ण कलेचे याच काळात सादरीकरण होते. गावच्या फडावर तमाशा रंगतो, गाणी-नृत्यावर ठेका धरला जातो. घरोघरी जाऊन ग्रामदेवतेचा जागर केला जातो. ढोलकी,
घुंगरू, तुणतुणे, गायक आणि नृत्य करणारा नायक असा साज गावागावांतून फिरतो. काही भागात टिपरीच्या तालावर नृत्य करतात. काही गावात मडक्याला विशिष्ट वनस्पतीच्या पाती लावून त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजाच्या नादात गाणी सादर केली जातात. त्याला डेरा म्हणतात. लहान मुला-मुलींचे शिमग्याचे सोंग तर या दिवसात फार प्रसिद्ध आहेत. पत्र्याच्या लहान डब्यांना प्लास्टिक गुंडाळून तयार केलेली वाद्ये, तोंडावर मुखवटे आणि चित्रपटातील, भजनातील आणि लोकसंगीतातील गाणी म्हणत घरोघरी जाऊन मुले पोस्त जमा करतात. मुली सुद्धा खोटेखोटे नवरा-नवरी घेऊन गाणी गात पोस्त जमा करतात. गावातील दुकानदार, गाडीवाले, प्रवासी, व्यापारी, फेरीवाले यांच्याकडून पोस्त जमा केला जातो. त्यानंतर एकत्र येत मिळालेल्या पैशातून समूह भोजन, विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात.
- हळकूंड प्रथा : होळीसाठी लागणारी लाकडे घराघरांतून जमा केली जातात. क्वचित एखाद्या घरासमोरून चोरूनही लाकडे नेली जातात. आदल्या दिवशी जमा केल्या जाणाऱ्या लाकडांना चोर हळकूंड म्हणतात.
- समूह शिकार : पूर्वी होलिकोत्सवात गावातील लोक जंगलात शिकार करायला जायचे. दिवसभर फिरून मिळालेली शिकार एकत्र शिजवून समूह भोजनाचा आनंद घेतला जायचा.
- पोस्त परंपरा : आधुनिक काळात ग्रामीण भागात एक दिवस एकत्र येत तिखट, गोडाचे भोजन बनविले जाते. रात्री पारावर सार्वजनिक ठिकाणी सर्व आप्तेष्ट एकत्र येऊन सहभोजनाचा आनंद घेतात.
- चाकरमान्यांचे आगमन ः उद्योग-व्यवसायानिमित्त शहरात स्थलांतरित झालेले चाकरमानी होळी सणासाठी आवर्जून गावांत येतात. त्यामुळे या दिवसांत गावे गजबजलेली दिसतात.
शिमगा हा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणासाठी सर्वजण गावी येतात. यानिमित्ताने गाठीभेटी होतात. लोकनृत्य, लोकसंगीताचा फड जमतो. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते.
- कल्पेश पोटले, ग्रामस्थ
माणगाव ः रायगडातील शिमगोत्सव
................
पेणमध्ये कोळीवाड्याची होळी गगनचुंबी
पेण ः कोकणात गणेशोत्सवाबरोबरच होळी सणाला विशेष महत्त्व आहे. पेण तालुक्यात होलिकोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून कोळीवाड्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही उंचच्या उंच नवलाईने सजवलेली होळी उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ४० ते ५० फूट उंच गगनचुंबी होळ्या दोन दिवस अगोदरच उभारण्यात आल्या आहेत. गावातील तरुण जंगलातून सावर नावाचे झाड आणून त्याला रंगरंगोटी, फुलांची सजावट, रंबीबेरंगी पताका लावून होळी म्हणून उभारतात. गावातील आबालवृद्ध या वेळी एकत्र येत लोकनृत्याचा फेरा धरतात. कोळीवाड्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी गगनचुंबी होळीपुढे त्यांची उंची ठेंगणीच वाटते.
-------------------
ग्रामदैवत काळभैरवनाथ पालखीतून सहाणेवर येणार
पोलादपूर ः ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात सोमवार ६ मार्च ते रविवार १२ मार्चपर्यंत होलिकोत्सव साजरा होणार आहे. काळभैरवनाथ महाराज पालखीतून वाजत गाजत सहाणेवर येणार आहेत, त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास होळी लावण्यात येणार येईल. यादिवशी सावंतकोंड, पार्टेकोंड, प्रभातनगर, हनुमाननगर यांची जागर व्यवस्था असणार आहे. त्यानंतर आठवडाभर प्रत्येक भागातील ग्रामस्थ जागर करतील. रविवारी पहाटे ५ वाजता श्री देव काळभैरवनाथ पालखी मिरवणूक शहरातून निघणार असून रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. त्यानंतर उत्सवाची सांगता होईल.