ग्रामीण भागातील बाजारापेठा रंगल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागातील बाजारापेठा रंगल्या
ग्रामीण भागातील बाजारापेठा रंगल्या

ग्रामीण भागातील बाजारापेठा रंगल्या

sakal_logo
By

दिलीप पाटील, वाडा
होळीचा सण तोंडावर आला आहे. त्यामुळे आतापासूनच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील बाजारपेठा रंग, पिचकाऱ्या, साखर गाठ्यांनी सजल्या आहेत. वाडा शहर, कुडूस, खानिवली, शिरीषपाडा व आबिटघर या तालुक्यातील प्रमुख बाजारपेठा होळीनिमित्त विविध साहित्य आणि रंगांनी सजल्या आहेत.
रोजगारासाठी शहरी भागात गेलेले आदिवासी बांधव होळीच्या सणाला आवर्जून आपापल्या गावी परतत असतात. त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मूळगावी येण्यापूर्वी ते तालुका मुख्यालयी असलेल्या बाजारपेठेत हजेरी लावताना दिसत आहेत. धुळवडीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पिचकाऱ्या, रंग, फुगे अशा विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी बाजारपेठाही सजल्या आहेत. पिचकाऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येत आहेत. छोटी बंदूक, प्रेशर गन, पाठीवरील गन अशा प्रकारच्या पिचकाऱ्या दिसत आहेत. रंगांमध्ये रासायनिक रंगांना बगल देत आयुर्वेदिक, सुगंधी रंगांचे प्रमाण अधिक दिसत आहेत. वनस्पतींपासून बनविलेल्या आयुर्वेदिक (हर्बल) रंगांना ग्राहकांची अधिक पसंती दिसून येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.
किराणा दुकानात पुरणपोळ्या बनविण्यासाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर काही भाविकांकडून होळीसाठी श्रीफळ, साखरगाठी खरेदीही सुरू झाली आहे. यंदा चीनमधील उत्पादनांवर बंदी असल्याने विविध वस्तूंचे दर दुपटीने वाढले आहेत, अशी माहिती कुडूस येथील व्यापारी श्रीकांत भोईर यांनी सांगितले.
-----
कासा बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
महेद्र पवार, कासा
कासा ग्रामीण भागातील जवळपास ३० गावांमधून नागरिक कासा आठवडा बाजारात खरेदीसाठी येत असतात. प्रत्येक सणाच्या येणाऱ्या आदल्या दिवशी येथे मोठा बाजार भरतो, त्यानिमित्त आदिवासी बांधव ती ती खरेदी करीत असतात. आजच्या या बाजारात होळीनिमित्त लागणाऱ्या अनेक वस्तूंची दुकाने लागली होती. त्यामध्ये साखर माळा, नारळ, हार-फुले, पुरणपोळीसाठी गूळ, मैदा आदी सामान खरेदीसाठी गर्दी झाली होती.
सूर्यानगर, तलवाडा, वांगर्जे, पिंपलशेत, वाघाडी, बापूगाव, तवा, चारोटी, भराड, घोळ, सोनाळे, महालक्ष्मी, सारणी इत्यादी गावांतून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे ठिकठिकाणी कासा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तसेच पूर्वी होळीच्या काही दिवस अगोदर पोस्त मागण्याची पद्धत होती, त्याचे सध्या प्रमाण कमी झाले आहे, तरी या आठवडा बाजारात आदिवासींचे पारंपरिक तारपा वाद्य वाजवून विविध प्रकारची सोंगे, रूपे घेऊन नाच करून पैसे मागितले जात होते.
...
गणपती, दिवाळी, होळी हे तीन सण येथील नागरिकांसाठी महत्त्वाचे आहेत. यात होळी म्हणजे मोठा सण मानला जातो. यात मोठी खरेदी केली जाते. तीन-चार महिने बाहेर केलेल्या कामाचे पैसे हाती आल्याने सणानिमित्त खरेदी केली जाते. या चार दिवसांत आमचा मोठा व्यवसाय होतो, असे दुकानदारांनी सांगितले.