पालघरमध्ये एक गाव एक होळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये एक गाव एक होळी
पालघरमध्ये एक गाव एक होळी

पालघरमध्ये एक गाव एक होळी

sakal_logo
By

प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्यात पारंपरिक होळी उत्सवाला महत्त्व आहे. या उत्सवात ग्रामीण भागात रूढी, परंपरा जपली जात आहे. होळी साजरी करताना प्रत्येक भागात रुजलेली परंपरा तरुण पिढी उत्साहात स्वागत करत आहे. वसई तालुक्यातील कलाकारांचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गावात १२६ वर्षांची परंपरा अद्यापही जोपासली जात आहे. ‘एक गाव एक होळी’ साजरी करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र येतात हे विशेष म्हणावे लागेल.
नायगाव पूर्वेकडील जूचंद्र गाव नाटककार, रांगोळी कलाकार, नृत्य कलाकार यासह साहित्यिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या सुमारे ३० हजारांच्या आसपास आहे. येथे नवविवाहित जोडप्यांना होळीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मान दिला जातो. यंदाही जूचंद्र गावात ‘एक गाव एक होळी’ उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. जूचंद्र धार्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोज म्हात्रे, उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, सचिव एकनाथ पाटील, कोषाध्यक्ष धनेश्वर म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थांनी होळी उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.
जूचंद्र गावातील पारंपरिक होळी उत्सव हा आगळ्यावेगळ्या पद्धतीने बैलगाडीने गावात मिरवणूक काढली जाते. बँडच्या तालावर ज्येष्ठांसह, तरुणाई आनंद घेते. यानंतर विधिवत पूजा केली जाते. यावर्षी होळीपूजेचा मान बांडोरी घराण्याला दिला असून गावातील दानशुरांकडून होळी उत्सवाला मदत केली आहे.
------------------
विविध स्पर्धांचे आयोजन
जूचंद्र गावातील होळीला कोंबड होळी म्हणून संबोधली जाते. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना ‘केरूबाईचा ठेवा’ यांच्याकडून पैठणी भेट दिली जाणार आहे; तर सोमवारी (ता. ६) जि. प. शाळा येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये मनोरंजनात्मक नृत्याविष्कारासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
----------------------
होळीनिमित्त जूचंद्र गावातील सर्व नागरिक एकत्र येतात. त्यामुळे आनंद द्विगुणित होत असतो. पारंपरिक पद्धत तरुण पिढी अद्यापही जपत आहे.
- भरत म्हात्रे, ग्रामस्थ, जूचंद्र
---------------------
माहेरवाशीण येणार घरी
जूचंद्र गावात आगरी समाज मोठ्या प्रमाणात आहे. येथील मुलींचा विवाह झाल्यानंतर त्या सासरी जातात, मात्र होळीला त्यांचे गावात आगमन होते. यावेळी घरी त्यांच्यासाठी गोडधोड केले जाते. हर्ष-उल्हासात स्वागत केले जाते. त्यामुळे सणाला नवरंगाचे रूप निर्माण होत असते.