क्रीडाप्रेमींची मैदान वाचवा मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडाप्रेमींची मैदान वाचवा मोहीम
क्रीडाप्रेमींची मैदान वाचवा मोहीम

क्रीडाप्रेमींची मैदान वाचवा मोहीम

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः मुंबईतील विविध प्रकल्पबाधितांचे मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यासाठी बांधण्यात आलेल्या इमारती तसेच मेट्रो कारशेडसाठी परिसरातील मोकळे भूखंड वापरण्यात आले. परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली; मात्र नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी मैदाने मात्र उरली नाहीत. येथील इमारत क्रमांक २४ समोर असलेल्या रिकाम्या भूखंडावर परिसरातील क्रीडाप्रेमी विविध मैदानी खेळ खेळत असतात. तो भूखंडदेखील बांधकामासाठी देण्यात आल्याचे कळताच महाराष्ट्रनगर क्रिकेट क्लब व परिसरातील क्रीडाप्रेमी हे मैदानासाठी एकत्रित आले आहेत. हा भूखंड मैदानासाठी राखून ठेवण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. महाराष्ट्रनगर येथील इमारत क्रमांक २४ समोर रिकामा भूखंड आहे. या भूखंडावर परिसरातील क्रीडाप्रेमी अंडरआर्म क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल खेळांचा तसेच पोलिस भरतीसाठी व्यायाम सराव करत असतात. या मैदानात विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांचे तसेच शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. परिसरातील लोकसंख्या तसेच क्रीडाप्रेमींची संख्या पाहता हे मैदान अपुरे आहे व मैदानासाठी परिसरात जागा उपलब्ध नाही. हे मैदानदेखील हातचे जाणार असल्याचे कळताच क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून ही परिस्थिती आहे. याविषयी स्थानिक नगरसेविका ऋतुजा तारी, आमदार नवाब मलिक तसेच खासदार राहुल शेवाळे यांना पत्र देऊन भूखंड मैदानासाठी राखीव करण्याचे साकडे घातले होते. नवाब मलिका यांनी एम पूर्व विभागाच्या सहायक आयुक्तांना पत्र पाठवले होते. परिसरात इतर कोणतेही मैदान उपलब्ध नसल्याने आवश्यक कारवाई करून हा भूखंड मैदानासाठी राखीव ठेवण्याचे आवाहन त्या पत्राद्वारे मलिकांनी केले होते. महाराष्ट्रनगर क्रिकेट क्लबने पुढाकार घेत हे मैदान वाचवण्यासाठी परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवली असून त्याला क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.