
जेव्हीपीडीतील वाहनतळासाठी पर्यायी जागा द्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम उपनगरात ‘जेव्हीपीडी’ येथे भूमिगत वाहनतळाला स्थानिकांनी सातत्याने विरोध केला आहे. नागरिकांच्या या विरोधामुळे सुरुवातीला भूमिगत वाहनतळाच्या बाजूने असणाऱ्या आमदार अमित साटम यांनी आता प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहित साटम यांनी प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा, अशा आशयाचे पत्र लिहिले आहे.
अनेक ज्येष्ठ नागरिक, शहर नियोजनकार आणि वास्तुविशारद तज्ज्ञ यांनी जेव्हीपीडी येथील पुष्पा नरसी पार्कच्या भूमिगत वाहनतळाला विरोध केला होता. या सर्वांच्या हरकतींमध्ये तथ्य असल्याचे साटम यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या उद्यानाचा आकार त्रिकोणी असल्यानेच जागेच्या वापराबाबतचे अनेक विषय आहेत. शिवाय या ठिकाणाला पर्यायी जागाही नागरिकांनी सुचवल्या होत्या. त्यामुळेच साटम यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात सध्याच्या पुष्पा नरसी पार्कच्या भूमिगत वाहनतळाच्या प्रकल्पाला पालिकेच्या पर्यायी जागांचा विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.
जेव्हीपीडी मार्केट सोयीचे
जेव्हीपीडी येथील उद्यानाच्या नजीकचा तीन एकरच्या जेव्हीपीडी मार्केट जागेचा पर्याय आमदार साटम यांनी आयुक्तांना सुचवला आहे. सध्या या जागेची मालकी पालिकेकडे आहे. त्याठिकाणी गॅरेज आणि डेपो तसेच पालिकेच्या सेवा सुविधांसाठी ही जागा आरक्षित आहे. या ठिकाणी भूमिगत वाहनतळ होतानाच एक चांगला बॅंक्वेट हॉल आणि सभागृहदेखील तयार होऊ शकतो. त्यामधून पालिकेला आर्थिक हातभारही लागेल. त्यामुळे या पर्यायाचा पालिकेने विचार करावा, असेही साटम यांनी पत्रात नमूद केले आहे.