
सोने तस्करीतील आंतररार्ष्ट्रीय टोळीचा सदस्य अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : दीडशे कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीतील एका साथीदाराला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) गुडगाव येथून शुक्रवारी (ता. ३) अटक केली आहे. नवनीत सिंह असे त्याचे नाव असून सोन्याची तस्करी करणाऱ्या चीन आणि दुबईतील नागरिकांचा समावेश असणाऱ्या टोळीचा तो सदस्य आहे.
चीन-दुबईतील टोळीशी संबंधित दोघांना गेल्या वर्षी मे महिन्यात डीआरआयने अटक केली होती. या प्रकरणी ७ कोटी रुपये किमतीचे १६ किलो सोने जप्त करण्यात आले होते. हे सोने हाँगकाँगमधून आणले होते आणि एअर कार्गोद्वारे भारतात आणले जात होते. आरोपी इलेक्ट्रिक ब्रेकर यंत्रात दडवून सोन्याची तस्करी करीत होते.
डीआरआयच्या माहितीनुसार सिंह या टोळीचा प्रमुख सदस्य आहे. त्याने तस्करी करून आणलेल्या सोन्याची वाहतूक आणि ते लपवण्यासाठी मदत केली होती. तसेच इतर सदस्यांना लपवण्यासाठीही तो मदत करायचा.
डिसेंबर २०२१ मध्ये सिंह मुंबईत आला होता. त्याने कांदिवली येथे सदनिका आणि गोरेगावमध्ये एका आरोपीसाठी दुकानाची व्यवस्था केली होती. सिंह याने एका आरोपीच्या नावावर वाहन खरेदी केले होते. याच वाहनातून तस्करीचे सोने मुंबई एअर कार्गो संकुलामधून कांदिवलीतील सदनिकेपर्यंत नेण्यात येणार होते. इतर आरोपी या सदनिकेत यंत्रातून सोने बाहेर काढणार होते. यापूर्वी या टोळीने १५० कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे. बेकायदेशीर सोन्याच्या विक्री आणि खरेदीसाठी ते हवाला रॅकेटचा वापर करीत असल्याचा डीआरआयला संशय आहे. याप्रकरणी सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीचे काही सदस्य दिल्लीत असल्याचा डीआरआयला संशय आहे.