‘होळी रे होळी...पुरणाची महागडी पोळी’
डोंबिवली, ता. ५ (बातमीदार) : होळीच्या सणाला जेवणामध्ये तुपाच्या धारेसोबत पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. त्यामुळे होळीला पुरणपोळीशिवाय मजा नाही, पण होळीच्या सणाला यंदा महागाईची झळ बसली आहे. कारण सणानिमित्त बाजारात विक्रीसाठी असलेल्या पुरणपोळीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. त्यामुळे ‘होळी रे होळी पुरणाची महागडी पोळी’, असं म्हणतंच सणाचा आनंद घेण्याची वेळ अनेकांवर येणार आहे.
होळीच्या निमित्ताने घरगुती व विविध खाद्यपदार्थांच्या दुकानात, महिला बचत गटांच्या माध्यमातून पुरणपोळ्या मिळतील, असे फलक आतापासूनच झळकू लागले आहेत. या सणाला पुरणपोळीच्या नैवेद्याला आगळेवेगळे महत्त्व असते. सध्याच्या काळामध्ये घरासह नोकरी अशी तारेवरची कसरत करणाऱ्या महिला रेडिमेड पुरणपोळ्यांनाच अधिक पसंती देत आहेत. मात्र, यंदा पुरणपोळीला महागाईची झळ बसली आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा पुरणपोळीचे भाव पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. पुरणपोळीच्या दरांवर सध्या विविध वस्तूंची झालेली भाववाढ, इंधन दरवाढ, तसेच मजुरीचा परिणाम जाणवत आहे; पण पुरणपोळी महाग झाली असली तरी विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा पुरणपोळी विक्रेत्यांकडून केला जात आहे.
-----------------------------------------------
बाजारातील सध्याचे दर
पुरणपोळी हा पदार्थ महाराष्ट्रीयन नागरिकांसह परराज्यांत आवडीचा पदार्थ आहे. अशातच गेल्या वर्षी १८ ते २० रुपयांना एक मिळणारी पुरणपोळी यंदा २५ ते ३० रुपयांना मिळत आहे. विशेष म्हणजे, पुरणपोळ्यांचा आकार व वजनावर त्यांचे दर अवलंबून असतात. छोट्या आकाराच्या पुरणपोळ्या २५ रुपयांना तर मोठ्या आकाराच्या पुरणपोळ्या २८ ते ३० रुपयांना विकल्या जात आहेत.
-------------------------------------------
रेडिमेड पुरणपोळीला मागणी
अनेक ठिकाणी गृहिणींनी आधी मागणी केल्यास पुरणपोळ्या तयार करून दिल्या जातात. ग्रामीण भागामध्ये अजूनही पाट्यावर डाळ वाटून पुरण तयार करून मग पोळी बनवली जाते. ग्रामीण भागामध्ये अजूनही घरीच पुरणपोळी बनवली जाते. मात्र, शहरी भागामध्ये नोकरदार महिला रेडिमेड पुरणपोळीला अधिक पसंती देतात.
----------------------------------------------
मजुरीत वाढ झाल्याचा परिणाम
पुरणपोळ्या तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात. यापूर्वी दिवसाला १५० ते २०० रुपये मजुरी होती. मात्र, सध्या दिवसाला ३०० रुपये मजुरी घेतली जाते. यामुळे पुरणपोळीचे दरदेखील पाच ते दहा रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईचा फटका होळीला बसला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------------------------------
कोट
मिठाईच्या दुकानांमधून पुरणपोळीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. घरगुती पुरणपोळी बनवणाऱ्यांची संख्याही खूप आहे. महागाईत वाढ झाली असली तरी यंदा चांगल्याप्रकारे विक्री होईल.
- मंगल बडे, विक्रेत्या
सणानिमित्त पुरणपोळी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहवयास मिळत आहे. काही नागरिकांनी पुरणपोळीची आगाऊ नोंदणी केली आहे. कोरोनानंतर होळी सणानिमित्त पुरणपोळीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-हरीश गद्रे, विक्रेता
घरगुती पुरणपोळीला बाजारात चांगली मागणी आहे. सणानिमित्त अनेक बायका घरीच पुरणपोळी बनवून घरपोच करतात. होळीनिमित्त पुरणपोळीच्या ऑर्डर एक महिना आधीच यायला सुरुवात झाली आहे.
-रेखा सावंत, विक्रेती
----------------------------------------------
पुरणपोळीचे प्रकार भाव (रुपयांमध्ये)
पायनापल ६०
अंजीर १००
गाजर ४०
गुलकंद ८०
कोकोनट ६५
डाळ ३०
--------------------------------------
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.